आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जलसंधारणासाठी ४०० कोटी, मराठवाड्याला २७५ टँकरने पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेले तीन-चार वर्षे दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी सरकारी यंत्रणा आता कामाला लागली आहे. जलसंपदा विभागाची सर्व तांत्रिक यंत्रे या भागाकडे वळवण्यात आली आहेत. त्याचबरोबर जलसंधारणाची कामे करण्यासाठी ४०० कोटींचा मोठा निधी मराठवाड्याला देण्यात येणार आहे. सध्या या भागात सर्वाधिक २७५ टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी लावण्यात आले असून ते टँकर टेंडर पद्धतीने घेतले जात आहेत.

जलसंपदा विभागाची तांत्रिक यंत्रे जेसीबी, पोकलेन मराठवाड्याकडे वळवण्यात आली आहेत. यामुळे एक मजूर एखादे काम महिना करू शकेल तेवढे काम ही यंत्रे िदवसाला करू शकतील. एक हजार फुटाचा खड्डा एका दिवसात करण्याचे काम जेसीबी, पोकलेनने होऊ शकेल. यामुळे मराठवाड्यातील जलसंधारणाची कामे वेगाने होतील. याचबरोबर नदी किंवा धरणे यामधून गाळ काढण्याचे कामे ही यंत्रे जलदगतीने करतील, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

टँकरही टेंडर पद्धतीनेच
दुष्काळ निवारण व जलसंधारणाच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४०० कोटी तातडीने मंजूर केले आहेत. यापैकी सर्वात मोठा निधी मराठवाड्याला देण्यात येईल. तर उर्वरित निधी विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांना देण्यात येणार आहे, असे लोणीकर यांनी सांगितले. दुष्काळावर तात्पुरते उपाय करण्यापेक्षा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी टँकरचा सतत पुरवठा दुष्काळग्रस्त भागांसाठी करायचा असेल तर टेंडर पद्धतीनेच काढण्याचा निर्णयही घेतला आहे.

अधिकार्‍यांच्या वाहन भत्त्यात वाढ
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांकडे कालबाह्य झालेल्या गाड्या आहेत. यामुळे हीच सबब सांगून अधिकारी दुष्काळग्रस्त भागंचा दौरा करण्यास टाळाटाळ करतात. हे लक्षात घेऊन पाणीपुरवठा विभागातील ग्रामीण, भुजल व जीवन प्राधिकरण या तिन्ही विभागांच्या अधिकार्‍यांना आता दरमहा ४० हजार रुपये वाहनभत्ता सरकारने मंजूर केला आहे. वाहन भाड्याने घेण्याचे अधिकारही त्यांना देण्यात आले आहेत.