आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fund Rupees 1547 Corore From Cetral Govt. For State's Farmer

शेतकर्‍यांसाठी केंद्राने पाठविले 1,547 कोटी, कृषी कर्जावरील व्याजाचा दोन वर्षांचा परतावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील शेतकर्‍यांना कृषी कर्जावरील व्याज परताव्यापोटी देय असलेल्या 1,547 कोटी 57 लाख रुपयांच्या अनुदानाची रक्कम केंद्र शासनाकडून प्राप्त झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता.
शेतकर्‍यांना कृषी कर्जावरील व्याज परताव्यापोटी केंद्राकडून देय असलेली रक्कम प्राप्त होण्यासाठी 4 जूनला संबंधित केंद्रीय मंत्री आणि सचिवांची दिल्लीत एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. शरद पवार, अजित पवार आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह वित्त, कृषी, सहकार आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

वित्त मंत्रालयाचा आदेश
शेतकर्‍यांना देय असलेली रक्कम तातडीने वितरीत करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी आता झाली असून 1,547 कोटी 57 लाख रुपयांचा हा निधी वितरीत करण्याचे आदेश केंद्रीय वित्त मंत्रालयातर्फे दोन दिवसांपूर्वी जारी करण्यात आले.

शेतकर्‍यांना कृषी कर्जावरील व्याज परताव्यापोटी मिळणार्‍या 1,547 कोटी 57 लाख रुपयांपैकी 850 कोटी 58 लाख रुपये 2011-12 वर्षासाठी तर 376 कोटी 24 लाख रुपये 2012-13 वर्षासाठी आहेत. हे एकूण 1,226 कोटी 82 लाख रुपये रिझर्व्ह बँकेकडून नाबार्डकडे आणि नाबार्डकडून जिल्हा बँका तसेच सहकारी बँकांकर्डे वर्ग करण्यात येतील. उर्वरीत 320 कोटी 75 लाख रुपये रिझर्व्ह बँकेकडून 2011-12 वर्षासाठीच्या योजनेच्या खर्चापोटी राखून ठेवण्यात येणार आहेत.
राज्यात सध्या पावसाने चांगली सुरुवात केल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा हा निर्णय शेतकर्‍यांना दिलासा देणारा ठरणार आहे.