आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gadkari, Munde On BJP's First List News In Marathi

भाजपच्या उमेदवार यादीत मुंडेंसह 17 नावे जाहीर, प्रताप सोनवणेंचा पत्ता कट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या 17 उमेदवारांच्या पहिल्या यादीत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे व नितीन गडकरी यांची नावे अपेक्षेप्रमाणे आहेत. मात्र धुळ्याचे खासदार प्रतापराव सोनावणे यांचे तिकिट कापून डॉ. सुभाष भांबरे यांना उमेदवारी देण्याचा धक्काही भाजपने दिला आहे. त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमधून आलेल्या संजय काका पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे सांगलीतील भाजपमध्ये खळबळ माजली असून आमदार संभाजी पाटील नाराज झाले आहेत.

संजय काका पाटील यांच्या उमेदवारीमुळे सांगलीची निवडणूक चुरशीची होईल. काँग्रेसचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांना ते कडवे आव्हान देऊ शकतील. विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी आपली सून रक्षा खडसे यांच्यासाठी रावेर लोकसभेची उमेदवारी मागितली होती. विद्यमान खासदार हरीभाऊ जावळे यांचे तिकिट कापण्यासाठी त्यांनी आपली ताकदही पणाला लावली होती, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. आमदार नाना पटोले यांना भंडारा गोंदियामधून उमेदवारी देऊन राष्ट्रवादीचे ताकदवान नेते व खासदार प्रफुल पटेल यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. नितीन गडकरी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत असून त्यांच्या उमेदवारीमुळे नागपूरात निकराची लढाई होणार आहे. गडकरी यांचे भावी राजकीय भवितव्य ठरविणारी ही निवडणूक आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया यांच्या उमेदवारीमुळे रंगतदार ठरणार आहे. विलास मुत्तेमवार हे या मतदारसंघांमधून सातत्याने निवडून येत असून त्यांची विजयी परंपरा खंडित करण्याची व्युहरचना गडकरी यांच्या उमेदवारीदारे भाजपने निश्चित केली आहे.

सांगलीत धुसफूस
नुकतेच राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून पक्षात आलेले माजी आमदार संजयकाका पाटील यांना भाजपने सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याने जिल्हय़ात धूसफूस सुरू झाली आहे. पक्षाचे सांगलीतील आमदार संभाजी पवार यांनी थेट राजीनाम्याची धमकी दिली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना भेटून आपली नाराजी व्यक्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.