आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसावर कोट्यवधींचा सट्टा, ३ हजार कोटींपेक्षाही जास्तीची उलाढाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येरे..येरे पावसा..तुला देतो पैसा हे बालपणी तुम्ही आम्ही म्हटलेले बडबडगीत आता खरेच ठरू पाहत अाहे. कारण ‘पाऊस कधी येणार’ यावर आता मुंबईच्या सट्टेबाजारात कोट्यवधींचा सट्टा लागला आहे. एरवी बरोबर सात जूनला दरवर्षी मुंबईत दाखल होणारा मान्सून अलीकडे वातावरणात झालेल्या बदलांमुळे कधी मुंबईत हजेरी लावेल याची खात्री नाही. पावसाबाबतची नेमकी हीच अनिश्चितता सट्टाबाजारातल्या बुकींच्या पथ्यावर पडली आहे.
मुंबईसह देशभरात उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. वातावरणातील उष्णता लोकांना नकोशी झालेली असताना या उष्णतेने मुंबईच्या सट्टाबाजारातील वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. सट्टेबाजांनी आता थेट पावसावरच सट्टा घ्यायला सुरुवात केली आहे. धक्कादायक म्हणजे यासाठी देशभरातले "नामचीन' बुकी मैदानात उतरलेत. सध्याचे वातावरण पाहता येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता जरी कमी असली, तरी येत्या ५ किंवा ७ जूनला तो दाखल होईल, असा अंदाज या बुकींनी व्यक्त केलाय. या अंदाजावर थोडाथोडका नव्हे, तर तब्बल ३ हजार कोटींपेक्षाही जास्त रकमेचा सट्टा घेण्यात आल्याची माहिती सट्टाबाजारातील सूत्रांनी दिली आहे.

या जुगारासाठी सट्टेबाज पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेत. देश - विदेशातील हवामान खात्यांशी संबंधित तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. याशिवाय सरकारी हवामान खात्यांच्या अंदाजांवरदेखील नियमित लक्ष ठेवले जात आहे. मान्सूनच्या आगमनाच्या अंदाजाबरोबरच मुंबईत किती मिलिलिटर पाऊस पडणार, संपूर्ण पावसाळ्यात पाऊस कसा असेल अशा अनेक बाबींवर सट्टेबाजांनी बेटिंग घेतले आहे.

काय आहेत बुकींचे अंदाज?
*५ किंवा ७ जूनला मुंबईत पाऊस दाखल होईल.
*५ जूनला मान्सून मुंबईत दाखल झाल्यास १ रुपयाला ४० पैसे
*७ जूनला पाऊस पडल्यास रुपयाला ३० पैसे असा भाव घेण्यात आला आहे.
*मुंबईत यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीदरम्यान १६०० मिमी इतका पाऊस पडेल, असा अंदाज असून त्यावर एका रुपयाला २७ पैसे असा भाव आहे.

तोटा भरून काढण्याचा प्रयत्न
पोलिसांच्या सतर्कतेमुळे आयपीएल आणि क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सट्टेबाजांचे काेट्यवधींचे नुकसान झाले. ते भरून काढण्यासाठी सट्टेबाजांनी पावसावरच सट्टा घेतला. विशेष म्हणजे सर्व सरकारी वेधशाळांचे अंदाज आपल्या गिऱ्हाइकांना सोशल नेटवर्किंग साइट्सद्वारे पुरवण्याचेही नियोजन केले जात अाहे.

‘ऑगस्ट’वरच लक्ष
यंदा सर्वाधिक पाऊस आॅगस्टमध्ये पडण्याचे सट्टेबाजांचे भाकीत अाहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात ४०० मिमी पावसावर रुपयाला २७ पैसे भाव असून दुस-या आठवड्यात ५०० मिमीसाठी ५७ पैसे भाव आहे. तिस-या आठवड्यात मात्र ६०० मिमी पाऊस पडल्यास १.३० रुपये आणि ७०० मिमी पाऊस पडल्यास तब्बल २.४० रुपये भाव दिला गेला आहे. इतकेच नाही तर, सप्टेंबरअखेरीस ५०० मिमी इतका पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करत थेट एक रुपयाला ३ रुपये असा भाव सट्टेबाजांनी दिला अाहे.