आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Generic Medicinal Shops And Health Minister Dr. Deepak Sawant

जेनेरिक औषधी दुकानांना आरोग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत यांचाच विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गोरगरिबांना महागडी औषधे परवडत नाहीत म्हणून त्यांना स्वस्तातील जेनेरिक औैषधे उपलब्ध करून देण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली जेनेरिक औषधी दुकाने योजना फडणवीस सरकारच्या कार्यकाळात गुंडाळली जाण्याची शक्यता आहे. या योजनेला खुद्द आरोग्य मंत्री डाॅ. दीपक सावंत यांचा विरोध असल्याने राज्यभर अशी जेनेरिक औषधांची दुकाने उघडण्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

आघाडी सरकारच्या योजनेनुसार राज्य सरकारच्या वतीने दोन जेनेरिक औषधी दुकाने, तर अन्य काही दुकाने स्वयंसेवी संस्थांनी सुरू केली. मात्र, आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांचाच जेनेरिक औषधी दुकाने सुरू करण्यास विरोध आहे. अशी दुकाने सुरु झाल्यास सरकारी रुग्णालयांतील औषधांचा काळाबाजार सुरू होण्याची शक्यता असल्याचे सांगत आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी जेनेरिक औषधी दुकाने सुरू करण्यास विरोध केला आहे. डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन्समध्ये लिहून दिली जाणारी फार्मा कंपन्यांची महागडी औषधे सर्वसामान्यांना परवडण्यासारखी नसतात. त्या औषधाची मूळ रुप औषधे जेनेरिक औषधी दुकानांत अत्यंत स्वस्तात उपलब्ध असूनही डॉक्टर ती मूळरुप औषधी न लिहिता फार्मा कंपन्यांनी ठेवलेली नावे लिहितात. त्यामुळे स्वस्तात होणारा उपचारही महागात पडत असल्याचे लक्षात आल्यावर आघाडी सरकारमधील आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी या औषधांची दुकाने सुरु करण्याची योजना आखली. त्यानुसार दुकाने सुरुही केली.
काळाबाजार होईल : डॉ.सावंत
सरकारी रुग्णालयांमध्ये आम्ही जेनेरिक औषधेच देतो. त्यामुळे जेनेरिक औषधांची दुकाने सुरु करणे योग्य नाही. अशी दुकाने सुरू झाल्यास औषधांचा काळाबाजार होऊ शकतो. ही औषधे सरकारी रूग्णालयांमध्ये मिळण्याऐवजी खासगी दुकानांमध्ये विकली जातील, अशी डॉ. सावंत यांची भूमिका आहे. जे सरकारी रुग्णालयातच येत नाहीत त्यांना ही औषधे कशी मिळणार विचारता आरोग्यमंत्री म्हणाले, त्यांनी सरकारी रुग्णालयात यावे. सरकारी रुग्णालयात साठाच नसल्यामुळे अनेक रुग्णांना औषधे मिळत नाहीत, हे लक्षात आणून दिल्यावर आरोग्यमंत्री म्हणाले, आता तसे होत नाही. ई-औषधी योजना असल्याने कोणत्या इस्पितळात कोणती औषधे आहेत ते कळते. त्यामुळे जेथे औषधे कमी आहेत तेथे त्वरित पोहोचवली जातात.
योजना गुंडाळू नका-शेट्टी
माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनीही जेनेरिक औषधी दुकाने बंद करण्याच्या निर्णयाचा विरोध केला. गरीबांना औषधे मिळावीत म्हणून जेनेरिक औषधांची जास्तीत जास्त दुकाने सुरु आम्ही करण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारही पैसे देत होते. मात्र या सरकारला नरेंद्र मोदी सरकार पैसे देत नसल्यानेच ही दुकाने सुरु करण्यास विरोध केला जात आहे असे वाटते. ई-टेंडरिंगमुळे औषधे ३० टक्के स्वस्त मिळत असल्याने आणि जेनेरिकची किंमत कमी असल्याने गरीबांचा खूप फायदा होतो असेही सुरेश शेट्टी म्हणाले.
औषधेच मिळणार नसतील तर सक्ती कशी?
जेनेरिक औषधी निर्मितीत भारत आघाडीवर आहे. येथील जेनेरिक औषधे आफ्रिकेसह अन्य देशातही निर्यात केली जातात. केंद्र सरकारनेही डॉक्टरांनीही प्रिस्क्रिप्शनमध्ये जेनेरिक कंटेट लिहावे असे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारही असा निर्णय डॉक्टरांवर लादणार असल्याचेही आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. मात्र जेनेरिक औषधांची दुकानेच नसतील तर औषधे कशी मिळणार असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
शिवसेनेची आरोग्य आघाडी असहमत
शिवसेना आरोग्य सेनेचे अध्यक्ष अभिजीत वैद्य यांनी सावंतांच्या या भूमिकेला विरोध केला आहे. औषधांचा काळाबाजार कसा होईल ते समजत नाही. उलट सरकारने जेनेरिक औषधे जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजेत. ही औषधे स्वस्त असल्याने त्यांना प्रोत्साहन द्याव, त्यासाठी सरकारने स्वतः जास्तीत जास्त जेनेरिक औषधांची दुकाने सुरु करावीत, असेही वैद्य म्हणाले.