आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Generic Medicine First Mobile Van Issue In Maharashtra

जेनेरिक औषधांची पहिली मोबाइल व्हॅन लालफितीत अडकली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जेनेरिक औषधांचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी जेनेरिकचा प्रसार करण्याची भूमिका केंद्र व राज्य सरकारने वेळाेवेळी मांडली अाहे. जेनेरिकच्या प्रसारासाठी केंद्र सरकारने पावले उचलली असली तरी दिल्ली अन्न व अाैषध विभागाने (एफडीए) मात्र नियमावर बोट ठेवत देशातील जेनेरिक औषधांच्या पहिल्या मोबाइल व्हॅनला अजून परवानगी न दिल्याचे उघडकीस आले आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबईत जेनेरिक औषधांच्या पेढ्या सुरू केल्या असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत जेनेरिक औषधे पोहोचावीत यासाठी मोबाइल व्हॅन सुरू करण्याची योजना त्यांनी आखली होती. ‘दिव्य मराठी’नेही जेनेरिकच्या माेहिमेचा वेळाेवेळी पाठपुरावा केला अाहे. देसाई यांनी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची भेट घेऊन मुंबईत माेबाइल व्हॅन सुरू करण्याबाबत चर्चाही केली होती.

अहिर यांनी या योजनेला हिरवा झेंडा दाखवला होता. पश्चिम आणि पूर्व उपनगरासाठी प्रत्येकी एक अशा दोन मोबाइल व्हॅन या योजनेअंतर्गत सुरू केल्या जाणार होत्या. यासाठी दिल्लीतील एफडीएची परवानगी आवश्यक असल्याने त्यांच्याकडे फाइल पाठवण्यात आली होती. मात्र, एफडीएच्या नियमात मोबाइल व्हॅन बसत नसल्याने त्यांनी परवानगी नाकारली होती. पुन्हा पत्रव्यवहार करून त्यांना संपूर्ण फाइल पाठवण्यात आल्याची माहिती देसाई यांच्या कार्यालयातील नितीन शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधणार का?
‘मंत्री हंसराज अहिर यांच्याशी बोलणी झाल्यानंतर आम्ही मोबाइल व्हॅनची तयारी सुरू केली. टाटाच्या दोन व्हॅन घेण्यात आल्या असून त्या गुजरात येथील रुबी कंपनीकडून तयार करून घेण्यात येणार आहेत. व्हॅन तयार करण्यास साधारण दीड-दोन महिने लागतात. महाराष्ट्र दिनापासून आम्हाला या व्हॅन सुरू करायच्या होत्या; परंतु अजूनही परवानगी न मिळाल्याने काम रखडले अाहे’ असे नितीन शिंदे यांनी सांगितले. ‘एफडीएकडून परवानगी कधी मिळेल हे सांगता येणार नाही, मात्र ती मिळेलच. केंद्र सरकार स्वतःच जेनेरिकचा प्रसार करू इच्छित आहे, असे असताना दिल्लीच्या एफडीएने अजून परवानगी दिली नाही याचे आश्चर्य वाटत आहे,’ असेही शिंदे यांनी सांगितले.