आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ghuman Marathi Sahitya Sammelan News In Divyamarathi

साहित्य संमेलन : स्टॉलवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर प्रकाशक ठाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - घुमान येथे होणार्‍या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये स्टॉल लावण्याच्या निर्णयावर राज्यातील प्रथितयश प्रकाशक अजूनही ठाम आहेत. राजहंस, पद्मगंधा, ग्रंथाली, साकेत, लोकवाङ्मय आदी प्रकाशन संस्थांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे चार महिन्यांवर आलेल्या संमेलनातील पुस्तक विक्रीचे भवितव्य अंधारात दिसून येत आहे.

सोमवारी पुणे येथे मराठी प्रकाशक परिषदेच्या झालेल्या बैठकीत परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांनी घुमानला पुस्तकांचे स्टॉल लावण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यांच्या स्वत:च्या पद्मगंधा प्रकाशनाबरोबर राजहंस, ग्रंथाली,
लोकवाङ्मय गृहसारखे अनेक प्रथितयश प्रकाशकही घुमानला जाण्यासंदर्भात उदासीन आहेत. अक्षरधारासारख्या मोठ्या पुस्तक वितरण संस्थादेखील संमेलनामध्ये सहभागी होणार नाहीत. संमेलन राज्याबाहेर असल्यामुळे तेथील पुस्तक विक्रीतून वाहतूक खर्चही भरून निघणे अशक्य असल्याचे या प्रकाशकांचे म्हणणे आहे.

चंद्रपूरला २०११ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दीड कोटीची पुस्तक विक्री झाली होती, तर गेल्या वर्षी सासवड येथील संमेलनातही पुस्तक विक्रीला लक्षणीय प्रतिसाद मिळाला होता. मात्र, घुमानमध्ये प्रतिसाद मिळण्याबाबत शंका असल्यामुळे प्रकाशकांनी ही भूमिका घेतली आहे.
प्रकाशकांचा आक्षेप
चंद्रपूरसारख्या भागात संमेलन घेतले तेव्हा तेथील वाचकांनी अमाप पुस्तकांची खरेदी केली होती. एरवी अनेक पुस्तके ग्रामीण भागात उपलब्ध नसतात. संमेलनाच्या निमित्ताने ती पुस्तके या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यातून चांगली विक्री होण्यासाठी प्रकाशकांसमोरही संधी असते. त्यामुळे अशा भागांमध्ये संमेलन भरवण्याऐवजी जेथे मराठी वाचकांची संख्या जेमतेम आहे, त्या घुमानसारख्या ठिकाणी केवळ संत नामदेवांची समाधी आहे, म्हणून संमेलन का भरवले जाते, असा सवाल प्रकाशकांकडून केला जात आहे.

विक्रीबाबत शंका
घुमानला शून्य टक्के पुस्तक विक्री होईल. एखादा प्रकाशक वैयक्तिक स्टॉल लावेल; पण अनेकांना तेथे पुस्तक विक्री करणे परवडणार नाही. अरुणजाखडे, अध्यक्ष,प्रकाशक परिषद, पद्मगंधा प्रकाशन

२०१४ मध्येही अपेक्षित पुस्तकविक्री झाली नाही. घुमानला माेजक्या मराठी माणसांसाठी दुप्पट वाहतूक खर्च करून पुस्तके नेणे ती विकली जाण्याची आशा ठेवण्यात तथ्य नाही. श्यामदेशपांडे, राजहंसप्रकाशन

घुमानला पुस्तके नेणेच खर्चिक आहे. संमेलनाला लोक येतील; पण ती मराठी वाचणारे असतील का, याबाबत शंकाच आहे. वैभवपिंपळखरे, अक्षरधारापुस्तक वितरण संस्था