आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girish Bapat Orders Inquiry In Bogus Ration Cards Issue

रेशन माफियांना आता ‘मकोका’ लावणार - गिरीश बापट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रेशन दुकानातील धान्य वितरणात गैरव्यवहार करणार्‍या वाहतूक ठेकेदारांसह दोषी अधिकार्‍यांवर यापुढे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लावण्यात येईल, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.

नाशिक जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यात सार्वजनिक धान्य वितरणातील गैरव्यवहाराचा मुद्दा राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. त्याच्या उत्तरात मंत्री बापट म्हणाले, सुरगणा येथील शासकीय गोदामातील साखर, गहू, तांदूळ हे धान्य परस्पर विकले जात असल्याचे आढळून आले आहे. मात्र, येथील स्थानिक अधिकार्‍यांनी याबाबतची माहिती दिली नाही. त्यामुळे उपसचिव स्तरावरील अधिकार्‍यांची स्वतंत्र समिती नेमण्यात आली. या समितीने अहवाल सादर केला असून धान्य हडप करण्याची मालिकाच येथे घडत असल्याचे समोर आले. या तालुक्यात धान्य गैरव्यवहाराच्या साखळीत अधिकारी, दुकानदार आणि वाहतूक ठेकेदार गुंतल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणात एकूण बारा लोक अटकेत असून १६ अधिकारी व कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा बापट यांनी केली.

एकदम १७ व्या प्रश्नावर उडी
सुरगणा तालुक्यातील धान्य अपहाराचा तारांकित प्रश्न १७ व्या क्रमाकांवर होता. दररोज प्रश्नोत्तराच्या तासात कमाल ९ ते १० प्रश्नच होतात; परंतु आज हा प्रश्न पहिल्यांदा घेण्यात आला आणि १६ कर्मचार्‍यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली.

नाशिक जिल्ह्यातील ९ तहसीलदार निलंबित
सुरगणा तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्थेतील अपहारप्रकरणी गुरुवारी राज्यातील िनलंबनाची सर्वात मोठी घोषणा करण्यात आली. या भ्रष्टाचारप्रकरणी ९ तहसीलदारांसह १६ अधिकारी निलंबित करण्यात आले. याबाबतचा प्रश्न जयवंत जाधव, नरेंद्र पाटील, अनिल भोसले आणि हेमंत टकले यांनी उपस्थित केला होता.

१. रशीद तडवी (तहसीलदार सुरगणा) २. खैरनार (तहसीलदार सिन्नर), ३. उजागरे (तहसीलदार नाशिक शहर), ४. राठोड (तहसीलदार नाशिक तालुका), ५. कडलग (तहसीलदार पेठ), ६. पवार (तहसीलदार इगतपुरी), ७. आहेर (तहसीलदार निफाड), ८. बहिराम (तहसीलदार त्र्यंबकेश्वर), ९. कुलकर्णी (तहसीलदार दिंडोरी), १०. सायंकर (नायब तहसीलदार), ११. जवंजाळ (जिल्हा पुरवठा अधिकारी), १२. श्रीमती. भोसले (लेखाधिकारी), १३. खैरनार (सहायक लेखाधिकारी), १४. श्रीमती. खर्डे (अव्वल कारकून), १५. श्रीमती. चमनार, (नियतनाशी संबंधित), १६. श्रीमती. त्रिभुवन, (नियतनाशी संबंधित)

सुरगणाचे काय आहे प्रकरण?
- सुरगणा येथील शासकीय गोदामात ३० हजार ६८२ क्विंटल अन्नधान्य पुस्तकी साठ्याच्या तुलनेत कमी असल्याचे लेखा तपासणी पथकाच्या अहवालात आढळले होते. याप्रकरणी गुन्हा नाेंद झाला हाेता.
- गोदामपाल, वाहतूक ठेकेदार, वाहतूक प्रतिनिधी (नाशिक रोड, अंबड रोड), पुरवठा िनरीक्षक व तहसीलदार या अपहारात प्रथमदर्शनी दोषी असल्याचे आढळले.
- संबंधित गोदामपाल, वाहतूक प्रतिनिधी, पुरवठा निरीक्षक व तहसीलदार सुरगणा यांना पूर्वीच
निलंबित करण्यात आले आहे. त्यांची विभागीय चाैकशी सुरू आहे.
- वाहतूक ठेकेदार मे. एस. एन. मंत्री यांचे कंत्राट रद्द करण्यात आलेले आहे.
- अपहारातील दोषींकडून धान्याची रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना िदले आहेत.

सुरगणा हे तर हिमनगाचे टोक
सुरगणा येथील धान्य अपहाराची रक्कम साडेपाच कोटींच्या घरात आहे. सदर धान्य संबंधितांनी काळ्या बाजारात विकले असून हा घोटाळा म्हणजे राज्यातील िहमनगाचे केवळ टोक आहे असा दावा राष्ट्रवादीचे सदस्य हेमंत टकले यांनी केला.

बापट यांचे कौतुक
नाशिक जिल्ह्यातील स्वस्त धान्याच्या घोटाळाप्रकरणी तब्बल १६ अधिकार्‍यांना निलंबित केल्याची घोषणा करताच विरोधी बाकांवरील सदस्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री बापट यांचे कौतुक व आभार प्रदर्शन मानले. बापट यांनी धाडसी निर्णय घेतल्याची विरोधकांमध्येही चर्चा रंगली होती.

विशेष पथकाची स्थापना
रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍याच्या देखरेखीखाली ३५ पोलिस अधिकारी- कर्मचार्‍यांचे स्वतंत्र पथक स्थापण्याची घोषणा बापट यांनी केली.

ना भरारी, ना दक्षता पथक
राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचे एकूण सात विभाग आहेत. मात्र, धान्य वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी एकही दक्षता पथक (व्हिजिलन्स) कार्यरत नाही की भरारी पथकही तैनात नाही, अशी खंत बापट यांनी व्यक्त केली.

वाहतूक ठेकेदार गुंड
गरीबांना मिळणार्‍या स्वस्त धान्याचा अपहार करण्यास धान्य वाहतूक ठेकेदार मुख्यत्वे कारणीभूत असून हे ठेकेदार गुंड प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे यापुढे वाहतूक ठेकेदारांविद्ध कोणाची तक्रार आल्यास त्यांचे कंत्राट रद्द करू, करण्यात येईल, असे आश्वासनही बापट यांनी दिले.