आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री गिरीश महाजनांसह ५० डाॅक्टरांची पाड्यावर दिवाळी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पालघर जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात भेडसावणाऱ्या कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मोहीम हाती घेण्यात आली. याच मोहिमेचा भाग म्हणून शुक्रवारी धनत्रयाेदशीला जव्हार मोखाडा तालुक्यातील कुपोषणग्रस्त भागातील पाड्यामध्ये आरोग्यदायी दिवाळी साजरी करण्यात आली. मंत्री गिरीश महाजन यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर येथील आदिवासी पाड्यावर मुक्कामी होते.

राज्यातील पालघर तसेच इतर आदिवासी जिल्ह्यादरम्यान दुर्गम भागात भेडसावणाऱ्या कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तज्ज्ञ समिती नेमून यामध्ये कुमारिका, गरोदर महिला लहान मुले यांची तपासणी करून त्यानुसार प्रशिक्षण, उपचार संशोधन करण्यात येणार आहे. यानुसार ७७ डॉक्टर्स वेगवेगळ्या पाड्यांवर बालकांची तपासणी करत अाहे. या याेजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर वैद्यकीय शिक्षण विभागाचे ५० पेक्षा अधिक तज्ज्ञ डॉक्टर्सच्या उपस्थितीत जव्हार तालुक्यातील मोखाडा परिसरातील विविध आदिवासी पाड्यांवर जाऊन बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. संबंधित तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी कुपोषणापासून दूर राहण्यासाठी काय काळजी घ्यावी, याबाबत अादिवासींना मार्गदर्शन केले.

महाजन यांच्यासह सर्व डॉक्टरांनी पाड्यावरील आश्रमशाळेतच मुक्काम करून उपस्थितांसोबत संवाद साधला. या वेळी शरदजी ढोले, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. चंदनवाले, डॉ. रामराजे, डॉ. संध्या खडसे, गणेश गावित तसेच सर ज. जी. समूह रुग्णालय मुंबई, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय मुंबई, डॉ. एम. एल. ढवळे होमिओपॅथिक इन्स्टिट्यूट पालघर येथील तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच युनिसेफ, आरोग्य विज्ञान विद्यापीठ वनवासी कल्याण आश्रमाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अादिवासींकडून सांस्कृतिक कार्यक्रम
धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीला मानवंदना देऊन प्रत्यक्ष आरोग्य सेवा पुरवण्यात आली. सायंकाळी बालकांना दिवाळीच्या फराळाचे वाटप महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. आदिवासी बांधवांनीदेखील उपस्थितांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून स्वागत केले. या वेळी शोभेचे फटाके पेटवून सर्वांनी आनंददायी आरोग्यदायी दिवाळी साजरी केली.
बातम्या आणखी आहेत...