आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Seeks Narcotics Test On Maharashtra Minister Girish Mahajan For 'bribe Offer' Claim

पवार, तटकरेंची नार्को चाचणी करा, मीही तयार - गिरीश महाजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/ मुंबई - ‘जलसंपदा विभागातील कंत्राट मंजूर करण्यासाठी एका कंत्राटदाराने आपल्याला शंभर कोटींची ऑफर दिली होती’ असा गौप्यस्फोट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. त्यावर काँग्रेस- राष्ट्रवादीने जोरदार आक्षेप घेत त्या कंत्राटदाराचे नाव जाहीर करण्याची मागणीही केली आहे. ‘महाजन यांची नार्को चाचणी करून सत्यता तपासावी’ अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी केली. त्याला प्रत्त्युत्तर देताना ‘मी चाचणीस तयार आहे, मात्र त्यापूर्वी माजी जलसंपदामंत्री अजित पवार व सुनील तटकरे यांचीही चाचणी करावी’, असे आव्हान महाजन यांनी दिले आहे.

गुरुवारी गिरीश महाजन यांनी नाशिक दौर्‍यात त्र्यंबकेश्वर, नाशिक विश्रामगृह आणि सिंहस्थाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ‘मी मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर माझ्यासमोर आलेल्या ११०० कोटींच्या कामांसाठी १०० ते १२५ कोटी रुपयांची ऑफर काही कंत्राटदारांनी दिली होती. राष्ट्रवादीने यापूर्वी ते केले आहे. त्यामुळेच आता माझ्या नार्को चाचणीची मागणी करत राष्ट्रवादीचे नेते आपल्या कालावधीत केलेल्या भ्रष्टाचाराला लपवण्यासाठीच खटाटोप करत आहेत. त्यांच्या मागणीनुसार मी माझी नार्को टेस्ट करायला आताच तयार आहे. हवे तर लागलीच मुंबईलाच निघालो आहे; पण अजित पवार आणि सुनील तटकरे यांचीही नार्को टेस्ट करा. त्यांची नार्को केल्यास बाकीच्या चौकशीची गरज लागणार नाही. जो काही जलसंपदा खात्यात भ्रष्टाचार झाला आहे तो आपोआपच समोर येईल,’ असे प्रतिआव्हान महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

६० कोटींचे थेट २७०० कोटी
जलसंपदा विभागात आधीच्या सरकारच्या कार्यकाळात माेठा अनागोंदी कारभार झाला. माझ्यासमोर आलेल्या तीन फायलींमध्ये मोठ्या प्रमाणावर अनागोंदी आहे. ७० कोटींच्या कामांची रक्कम तीन महिन्यांत थेट ३२७ कोटींवर गेली आहे, तर दुसर्‍या एका कामाच्या फायलमध्ये ६० कोटींचे काम थेट २७०० कोटींवर गेले आहे. ही जनतेचीच लूट आहे. राज्याच्या आणि देशाच्या तिजोरीवर या मंडळींनी डल्ला मारला आहे. यापैकी एकाचीही गय केली जाणार नाही, असे महाजन यांनी ठणकावले.