आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष मुलाखत - सिंचन निधी ८ हजार कोटी, कामे ९५ हजार कोटींची !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सिंचनाची स्‍थ‍िती काय आहे?
राज्यापुढे खूप मोठे आव्हान असून मागणीनुसार निधीची मोठी कमतरता आहे. अर्थसंकल्पात वर्षाला ७ ते ८ हजार कोटी मिळतात. पुढील वर्षी त्यात वाढ होऊन एक हजार कोटी मिळतील; पण चांद्यापासून ते बांद्यापर्यंतची कामेच ९० ते ९५ हजार कोटींच्या घरात आहेत.
कामांच्या किमतीही वाढ होत असल्याने खर्च अफाट होत जाणार असल्याने कामे पूर्ण करण्याचे आव्हान पेलणे खूपच कठीण आहे. कर्ज, रोखे, केंद्राची मदत तसेच अन्य मार्गाने पैसा उभा केला तरी पुढील ४ वर्षांत ५० ते ६० हजार कोटींची कामे होऊ शकतात.विदर्भ, मराठवाड्याचा सिंचनातील अनुशेष पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागातील कामांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे.

शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर अपूर्ण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?
विदर्भ, मराठवाड्यातील प्रकल्पांचे सुधारित प्रशासकीय मान्यतेचे (सुप्रमा) अधिकार संबंधित पाटबंधारे मंडळांना देण्यात आले आहेत. प्रकल्प पूर्णत्वाच्या कोणत्या टप्प्यावर आहेत, याचा आढावा घेऊन प्रकल्पांचा अग्रक्रम ठरवण्यात येईल आणि प्राधान्य क्रमानुसार आर्थिक गुंतवणूक केली जाईल. ज्या प्रकल्पांपासून ३ वर्षात प्रत्यक्ष सिंचन लाभ शेतकऱ्यांना मिळू शकेल, अशा प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येणार आहे. विर्भातील राजापूर, डोंगरगाव, रायगड, पोपटखेडा,निम्म ज्ञानगंगा, सोड्या टोला, भिवकुंड, लोणवडी, पूर्णा, बोरखेडी या प्रकल्पांचा सुप्रमा गेल्या ४ वर्पापासून प्रलंबित होत्या. त्यांना गती देण्यात आली आहे.

वर्षभरात सिंचनासाठी किती निधी प्रत्यक्षात खर्च केला गेला आणि त्यामधून काय साध्य झाले?
२०१५-१६ या वर्षात ६०६१.२९ कोटी इतकी तरतूद करण्यात आली होती. यामधून ३९ प्रकल्प पूर्णत्वाकडे नेऊन ७६७.४६८ दलघमी पाणीसाठा निर्मितीचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. यामधून ७१,४११ हेक्टर सिंचन क्षमता निर्मिती होऊ शकेल. मात्र पुनवर्सन, भूसंपादन, पर्यावरण यासारख्या प्रश्नांमुळे सिंचनाचा निधी पडून राहत असल्याचेही दिसून आले. विशेषत: आत्महत्यांची संख्या मोठी असलेल्या अमरावती जिल्ह्यात तर या साऱ्याचा परिणाम होऊन ४५०० कोटी पडून असल्याचे दिसून आले. यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गोसीखुर्द प्रकल्पावर हजारो कोटी खर्च करण्यात आले, त्यामधून अपेक्षित सिंचन झाले नाही.
याविषयी काय सांगाल?
पुनर्वसन, कालवे, पाणी उचल यामुळे सिंचन होऊ शकलेले नाही. गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्याच्या जलसेतूचे कायमस्वरूपी मजबुतीकरण करण्यासाठी लागणाऱ्या १५.५४ कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आसोल मेंढा प्रकल्पाच्या १० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होणार असून गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गतदेखील १० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल. केंद्रानेसुद्धा गोसीखुर्द प्रकल्पासाठी मदत देऊ केली आहे.

सिंचन घोटाळ्याची चौकशी कुठल्या टप्प्यावर आली आहे?
यापूर्वी या घोटाळ्याशी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांची पुढील चौकशी सुरू आहे. घोटाळ्याचे आरोप असलेले माजी मंत्री अजित पवार तसेच सुनील तटकरे यांची प्राथमिक चौकशी झाली आहे. घोटाळ्यात गुंतलेल्या कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, ही आमची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे.
बातम्या आणखी आहेत...