आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गर्भलिंगनिदान करणा-या डॉक्टरांना शिक्षा योग्यच'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गर्भलिंगनिदान कायद्याचे उल्लंघन करणा-या डॉक्टरांना दिलेली शिक्षा योग्यच असल्याचे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने आपल्या शिक्षेला आव्हान देणा-या डॉक्टरची याचिका गुरुवारी फेटाळून लावली.
या कायद्यानुसार, रेडिओलॉजिस्ट आणि स्त्रीरोगतज्ज्ञांना तपासणीसाठी येणा-या गर्भवती महिलांची नोंद ठेवावी लागते. त्यात आपल्याला गर्भाचे लिंग जाणून घ्यायचे नसल्याचे रुग्ण महिलेला आणि आपण संबंधित रुग्ण महिलेला तिच्या पोटात कुठला गर्भ आहे, हे सांगणार नसल्याचे नमूद करणारा गोपनीय ‘फॉर्म एफ’ भरावा लागतो. या नोंदी दोन वर्षांसाठी जतन कराव्या लागतात. तसे न करणा-या डॉक्टरांचा प्रॅक्टीस करण्याचा परवाना रद्द करण्याची तरतूद या कायद्यात आहे. नवी मुंबई येथील डॉ. सुजित डांगे यांनी आपला परवाना रद्द करणा-या आरोग्य अधिका-यांविरोधात 2011मध्ये न्यायालयात याचिका दाखल केली होती. रुग्णालयात येणा-या गर्भवती महिलांची नोंद न ठेवल्याच्या कारणावरून नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिका-यांनी डांगे यांचा परवाना रद्द केला होता. परंतु, ही किरकोळ चूक असल्याचा दावा करत आपल्यावरील कारवाईविरोधात डांगे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. स्त्रीभ्रूणहत्येसाठी गर्भलिंग निदान तंत्रज्ञानाचा केला जाणारा वापर महिलांच्या प्रतिष्ठेला आणि स्थानाला बाधा पोहोचवणारा आहे. त्यामुळे परवाना रद्द करण्याचा महापालिकेने घेतलेला निर्णय मनमानी नाही. तसेच, दोन वर्षांसाठी नोंदी जतन करण्याची या कायद्यात स्पष्ट तरतूद आहे. त्यामुळे कर्तव्यात कसूर झाली नसल्याचे याचिकाकर्त्यांनी कनिष्ठ न्यायालयात सिद्ध करावे, असे आदेश देत न्यायालयाने डांगे यांची याचिका निकाली काढली.