आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदानित 12 सिलिंडर द्या राष्‍ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अनुदानित सिलिंडरची संख्या नऊ केल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत केले आहे. या निर्णयाआधीच राज्य सरकारने तीन सिलिंडर देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत श्रेय लाटण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, संयुक्त कुुटुंबाना दरवर्षी 12 अनुदानित सिलिंडर देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने आधीच अनुदानीत तीन सिलिंडर देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. तसेच आणखी दिलासा देण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, असेही राज्य सरकारने सांगितले होते. त्यानुसार केंद्राने घेतलेला निर्णय म्हणजे या वचनाची पूर्तता असल्याचे कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले. डिझेलच्या किमतींमध्ये होणा-या वाढीबद्दल मात्र त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

शेतक-यांना डिझेलमध्ये सवलत द्या : मलिक
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही सरकारचे निर्णयाचे स्वागत केले. मात्र, संयुक्त कुटुंबांसाठी 12 गॅस सिलिंडर द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. अनेक लोक एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असून नऊ सिलिंडर त्यांच्यासाठी पुरेसे नाहीत. त्यामुळे अशा कुटुंबांसाठी आणखी अनुदानीत सिलिंडर द्यायला हवीत. तसेच डिझेलच्या दरवाढीमध्ये शेतक-यांना सवलती मिळावी. वीज वेळेवर मिळत नसल्याने शेतक-यांना कृषी पंपासाठी डिझेल वापरावे लागते. ट्रॅक्टरसाठीही डिझेलचा वापर होतो. अशा वेळी शेतक-यांना रोख अनुदान द्यावे, अशीही मागणी मलिक यांनी केली.