मुंबई- अरूणा शानबाग यांना 42 वर्षे नरकयातना भोगायला लावणा-या सोहनलाल वाल्मिकी याच्यावर नव्याने खटला दाखल करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी मागणी केली आहे. सोहनलालला फाशीची शिक्षा झाली तरच अरूणाच्या आत्म्याला शांती मिळेल असेही गो-हे यांनी म्हटले आहे. दरम्यान, नीलम गो-हे यांच्या मागणीला केईएम रूग्णालयातील परिचारिकांनी पाठिंबा दिला आहे.
केईएम रूग्णालयातील परिचारिका अरूणा शानबाग यांचे मागील आठवड्यात निधन झाले. मात्र 1 जून रोजी त्यांचा वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने केईएम रूग्णालय प्रशासन व परिचारिकांनी केईएममध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरवर्षी 1 जूनला अरूणाचा वाढदिवस केईएम प्रशासन व परिचारिका थाटात साजरे करीत असत. अरूणा ज्या बेडवर पडून राहत त्या बेडची सजावट केली जायचे. आजूबाजूचे पडदे बदलून तेथे मोग-याची फुले ठेवली जायची. अरूणाला मोग-याची फुले आवडायची अशा त्यांच्या जुन्या सहका-यांनी सांगितले होते. त्यानुसार मागील काही वर्षे अरूणाचा वाढदिवस केईएम साजरे करीत असे. मात्र अरूणाचा मागील महिन्यात मृत्यू झाला. त्यानंतर प्रथमच अरूणाची जयंती तथा वाढदिवस साजरा झाला. या छोटेखानी कार्यक्रमाला शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गो-हे उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना गो-हे म्हणाल्या, अरूणाला ज्या माणसाने मरणयातना दिल्या. तिचे आयुष्य बरबाद केले आणि सोहनलाल तिकडे निवांत आयुष्य जगत आहे. जुन्या कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला व त्याला कमी शिक्षा मिळाली. मात्र, निर्भया केसप्रकरणात जसा निकष लावला तसा लावत सोहनलालवर नव्याने गुन्हा दाखल केला आहे. सोहनलालला यूपी पोलिसांनी आज अटक केली आहे. ती कोणत्या निकषाखाली केली आहे ते अदयाप समोर आले नाही. मात्र, त्याच्यावर नव्याने खटला दाखल करून त्याला फाशीची शिक्षा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सोहनलालला फाशी झालीच पाहिजे तरच अरूणाच्या आत्म्याला शांतता मिळेल असेही गो-हे यांनी सांगितले.
दरम्यान, सोहनलालला फाशी देण्याच्या मागणीला केईएममधील परिचारिकांनी पाठिंबा दिला आहे. अरूणाचे जीवन हिसकावून घेणा-याला जगण्याचा अधिकार राहत नाही. त्यामुळे सरकारने त्याला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे असे एका परिचारिकेने सांगितले.