आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकप्रतिनिधींचा सन्मान करा, चांगली वागणूक न दिल्यास अधिका-यांवर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नागपूर येथील आयआयएमच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आमंत्रित न केल्याने आणि मुंबईतील एका कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा राज्यमंत्री असा उल्लेख केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज आहेत. त्यामुळेच खासदार, आमदार, मंत्री यांचा सरकारी अधिका-यांनी योग्य मानसन्मान ठेवावा यासाठी एक शासनादेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये लोकप्रतिनिधींच्या पत्रांना पाच दिवसांत उत्तर देण्याबरोबरच निमंत्रण पत्रिकेवर शिष्टाचाराप्रमाणे नावे देण्यासह सौजन्याची वागणूक देण्याचा आदेश सरकारी कर्मचा-यांना देण्यात आला आहे.

२७ जुलै रोजी काढण्यात आलेल्या शासनादेशात म्हटले आहे की, खासदार, आमदार भेटावयास येतेवेळी व भेट संपून परत जाताना अधिका-यांनी त्यांना उठून अभिवादन करावे, विधान मंडळ, संसद सदस्यांनी फोनवरून माहिती विचारल्यास त्यांना माहिती द्यावी व आदराने बोलावे असे न झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना जबाबदार धरण्यात यावे व त्यांच्याविरुद्ध प्रचलित शिस्तभंगवषयक नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.

विधानमंडळ सदस्य, संसद सदस्य यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, मंत्रालयीन विभागाचे सचिव यांनी पाठवलेल्या पत्र, निवेदन (फॅक्स, ईमेल वा कुरियरद्वारे प्राप्त झालेल्या टपालासह) सर्व पत्रांना मंत्र्यांनी वा अधिका-यांनी स्वतःच्या सहीनेच एका आठवड्याच्या आत पोच द्यावी, खासगी सचिव वा अधिनस्त अधिका-यांच्या स्वाक्षरीने पोच देऊ नये. पत्रांवर कालमर्यादेत केलेली कार्यवाहीही विचारात घेण्यात येणार असून उत्तर देण्यास टाळाटाळ वा कुचराई केल्यास संबंधित अधिकारी, कर्मचा-यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात
येईल, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

अशोक चव्हाण प्रकरणाचे प्रतिबिंब
माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण हे औरंगाबाद येथे एका मोर्चानंतर औरंगाबादचे जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांना भेटायला गेले होते. तेव्हा त्यांनी उभे राहून चव्हाण यांचे निवेदन स्वीकारले नाही. याबद्दल चव्हाणांनी राज्य सरकारला आपली तीव्र नाराजी कळवल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच आमदार व खासदार भेटावयास आल्यास त्यांचे स्वागत उठून उभे राहून करावे आणि ते जात असतानाही उभे राहून त्यांना निरोप द्यावा, अशा स्पष्ट सूचनाच या आदेशात देण्यात आल्या आहेत.