मुंबई - वाकोला पोलिस ठाण्यात सहायक उपनिरीक्षकाने वरिष्ठ निरीक्षकाची हत्या करून त्यानंतर आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेनंतर पोलिसांवरील वाढत्या कामाच्या ताणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांना तणावमुक्त करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा विचार करून त्याबाबतचा विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्तांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
शनिवारी रात्री वाकोलातील सहायक उपनिरीक्षक दिलीप शिर्के याने वरिष्ठ निरीक्षक विलास जोशी यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर आत्महत्या केली. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश फडणवीस यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना दिले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, शिर्के यांना सुटी दिली जात नव्हती ही बाब खरी आहे असे वाटत नाही, कारण त्यांना अगोदरच ३८ दिवसांची सुटी देण्यात आली होती. त्यानंतरही ते सुट्या घेत होते. शुक्रवारी रात्री ते ड्युटीवर नसल्याने त्यांची गैरहजेरी लावण्यात आली होती. त्यावरून त्यांचा
आपल्या वरिष्ठांशी वाद झाला. त्यानंतर ही घटना घडली. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, पोलिसांवर पडत असलेला अतिरिक्त ताण ही बाब अतिशय गंभीर असून तो कमी करण्यासाठी नेमक्या काय उपाय योजना करता येतील, याबाबत अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना मुंबई पोलिस आयुक्तांना देण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.