आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या प्रसूतीसाठी राज्यपाल राव यांची राज्य सरकारला सूचना, रुग्णालय निवडण्याचा महिलांना अधिकार द्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : ‘महाराष्ट्राने या देशाला दिलेल्या प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होत. महाराष्ट्रातील तळागाळातल्या रुग्णांच्या सेवेसाठीदेखील त्यांनी पक्षसंघटनेच्या माध्यमातून भरीव कार्य केले, असे भावपूर्ण उद्गार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी काढले. ‘परिचारिकांना नर्सेस म्हणण्याऐवजी वैद्यकीय सहायक असे संबोधण्यात यावे आणि गर्भवती महिलांना प्रसूतीकरिता आपल्या पसंतीचे रुग्णालय निवडण्याचा अधिकार मिळावा, यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा,’ अशा सूचना त्यांनी या वेळी केल्या.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण राव यांच्या हस्ते रविवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. राज्यपाल म्हणाले, विदेशात दर दहा हजारी लोकसंख्येमागे ४३ डॉक्टर असतात. भारतात मात्र ७ डॉक्टर अाहेत. ही संख्या वाढण्याकरिता वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढणे तसेच सार्वजनिक संस्थांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, कुली चित्रपटाच्या चित्रीकरणप्रसंगी गंभीर जखमी झालेले सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या शारीरिक उंचीला सामावून घेणारी एकमेव रुग्णवाहिका शिवसेनेच्या गिरगाव शाखेकडे उपलब्ध होती. याचा आम्हाला अभिमान वाटतो. पालिकेकडून अनेक मोठी कामे केली जात आहेत, पण हे सांगितले जात नाही. पालिकेवर फक्त भ्रष्टाचाराचे आरोप होतात, पण यंदा मुंबईत पाणी तुंबू दिले नाही, याचे कुणी कौतुक करत नाही. राज्यात अनेक लोक संस्थांसाठी जागा घेतात आणि महाविद्यालय काढतात. तसे बाळासाहेबांनी कधी केले नाही, असेही उद्धव म्हणाले.

१ हजार जागा वाढणार : महाराष्ट्रात वैद्यकीय परिषदेच्या मान्यतेने पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या एक हजार जागा वाढणार आहेत. प्रत्येक जिल्हा रुग्णालय अद्ययावत करून त्यांच्याशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याकरिता शासन प्रयत्नशील असल्याचे तावडे म्हणाले. मुंबई पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांत पदवीपूर्व प्रवेश क्षमता ६०० असून पदव्युत्तर जागा ७०० आहेत. शासनाकडे पदवीपूर्व २४०० आणि पदव्युत्तर ८५३ प्रवेश क्षमता असल्याची माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या वेळी दिली.

बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय लोकार्पण सोहळा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ,युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे , मंत्री सुभाष देसाई , रामदास कदम, डॉ दीपक सावंत ,विनोद तावडे, महापौर स्नेहल आंबेकर आदी.
बातम्या आणखी आहेत...