आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Goa Gangrape Victims Forced To Pose As Sex Workers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणींचा MMS तयार करणाऱ्या गँगरेपच्या आरोपींना गोव्याच्या मंत्र्यांनी ठरवले \'नादान\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गोव्याला सुटीत फिरण्यासाठी गेलेल्या दिल्लीतील दोन तरुणींवर पाच तरुणांनी सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत टॅक्सी चालकाच्या मदतीने सर्व आरोपींना अटक केली. ही घटना उत्तर गोव्यात अंजुना बीचवरील गावात घडली. या प्रकरणात पोलिस तपासात नवी माहिती उघड झाली आहे. आरोपींकडे एक एमएमएस क्लिप सापडली आहे. त्यात पीडित तरुणींकडून त्या अमली पदार्थांची तस्करी आणि देह व्यापार करत असल्याचे बळजबरीने वदवून घेण्यात आले आहे. दुसरीकडे, गोव्याचे पर्यटन मंत्री दिलीप पारुलकर यांनी पाचही आरोपींना 'नादान' म्हटले आहे. मंत्री महोदय म्हणाले, ती मुले नादान आहेत. त्यांच्यावर याआधी छोटे-मोठे गुन्हे दाखल आहेत. भविष्यात ते असं करणार नाहीत. झालेल्या घटनेचे मलाही दुःख आहे. या गुन्ह्यात सहभागी मुलींचेच चारित्र्य चांगले नाही.

पोलिसांनी सांगितले की, दिल्लीतील दोन तरुणींनी गोव्यात अंजुना बीचवर टॅक्सी किरायाने घेतली होती. वाटेत आरोपींनी अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी असल्याचे सांंगून टॅक्सी अडवली. मुलींना त्यांच्यासोबत एका फ्लॅटवर घेऊन गेले. तिथे मारहाण करत त्यांच्यावर अत्याचार केले.
काय आहे प्रकरण
दिल्लीहून पर्यटनासाठी गोव्यात आलेल्या दोन तरुणींना आरोपींनी षडयंत्र रचून गाठले. पाच आरोपींनी स्वतःला नारकोटीक्स विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून टॅक्सी ड्रायव्हरसह तरुणींचे अपहरण केले. त्यांना एका फ्लॅटवर नेऊन गँगरेप केला. ड्रायव्हरने सांगितले, 'आरोपींनी आम्हाला प्रथम अपूरा गावात नेले. तिथे लाकडी दांड्याने आम्हाला मारहाण करण्यात आली. आमच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. मध्यरात्री त्यांनी आम्हाला परत टॅक्सीकडे नेले आणि तरुणींकडून बळजबरीने त्या कॉल गर्ल्स असल्याचे कबूल करुन घेतले. आमच्या हातात काही पॅकेट्स देऊन आम्ही आंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असल्याचे आमच्याकडून वदवून घेतले. हे सर्व त्यांनी शूट केले.'

ड्रायव्हरने पकडून दिले आरोपी
गोवा पोलिसांनी 2 जून रोजी अजय कुमार कुशवाहा (39), जीवन पवार(26), नदीम खान(26), ट्रेबर जोसफ(26) आणि कमलेश चौधरी (21) यांना गँगरेप, अपहरण आणि दरोड्याच्या आरोपात अटक केली. टॅक्सी ड्रायव्हरच्या म्हणण्यानूसार, एक जूनच्या सायंकाळी सात वाजता तो तरुणींना त्यांच्या हॉटेलवरुन घेवून बागा बिचकडे निघाला होता. आरोपींनी अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यांनी ड्रायव्हरला सांगितले, की तरुणींच्या कुटुंबीयांना फोन करुन त्यांच्या सुटकेसाठी दीड लाख रुपयांची मागणी कर. त्याच्या एटीएममधून त्यांनी दहा हजार रुपये देखील काढून घेतले. त्यानंतर ड्रायव्हरला सोडून देण्यात आले. आरोपींच्या दहशतीला न भीता ड्रायव्हरने घडला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी ट्रॅप लावला. त्यांनी ड्रायव्हरकडून आरोपींपर्यंत निरोप पाठवला की पैसे मिळाले आहेत. आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले ते ड्रायव्हरच्या सांगण्यानुसार पैसे घेण्यासाठी आले आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. आता आरोपी पाच दिवसांच्या पोलिस कस्टडीत आहेत.