आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यास टाळाटाळ- भुजबळांचा केंद्रावर हल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वेळोवेळी केंद्राकडे केली; परंतु केंद्राने लक्ष न दिल्याने महामार्गाचा विस्तार झालेला नसल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

खेड तालुक्यातील भीषण अपघाताचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उटले. नियम 289 अन्वये विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी चर्चा उपस्थित केल्याची मागणी केली असता सभापती शिवाजीराव देशमुख यांनी त्याला त्वरित परवानगी दिली. सभागृहातील सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढले. कोकणाला नेहमी सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप कोकणातील आमदारांनी करीत मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत नसल्यामुळे अपघातांची संख्या वाढली असल्याचे सांगितले. त्यावर भुजबळ म्हणाले की, हा महामार्ग केंद्राच्या ताब्यात असल्याने राज्य सरकार त्याचे काम करू शकत नाही. केंद्राला अनेक वेळा काम लवकर पूर्ण करण्याची विनंती केली; परंतु काहीही झालेले नाही. केंद्रासमवेत झालेल्या तीन-चार बैठकांना शरद पवारही उपस्थित होते. तरीही केंद्राकडूनच दिरंगाई होत असल्याचे भुजबळ म्हणाले.