आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याच्या तस्करीत मोठी वाढ; डी गँग पुन्हा झाली सक्रिय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या तस्करीत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एकेकाळचा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची टोळी या तस्करीत पुन्हा सक्रिय झाली असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिली. जानेवारी 2014 पर्यंत मुंबईच्या विमानतळावर सुमारे 204 किलो सोने जप्त करण्यात आले आहे.
सोन्यावरील आयात शुल्क 10 टक्क्यांपर्यंत वाढवल्यापासून देशात या मौल्यवान धातूची तस्करी वाढली आहे. आयात सोन्याचे दागिने बनवल्यानंतर 20 टक्के सोने स्थानिक बाजारपेठेत, तर 80 टक्के सोने निर्यात करावे लागते. हा नियम न पाळणार्‍यांचा सोने आयातीचा परवाना रद्द केला जातो. त्यामुळे सोन्याची चणचण निर्माण झाली आहे. साधारणत: 20 वर्षांपूर्वी जेव्हा देशात सोने नियंत्रण कायदा अस्तित्वात होता, तेव्हा ज्या पद्धतीने सोन्याची तस्करी दाऊद, करीम लाला, छोटा राजन आणि अन्य तस्कर करायचे. अगदी तीच पद्धतही आता तस्करीसाठी वापरली जात आहे. कर वाढल्याने सोन्याची आयात 300 टनांनी घटली आहे. ही कमतरता दूर करण्यासाठीच तस्करीच्या मार्गाने आलेले सोने बाजारात मोठय़ा प्रमाणावर दिसून येत आहे.
सोन्याच्या तस्करीचे मोठे जाळे पसरवण्यात आले असून रोज जवळजवळ 50 लाख रुपयांचे सोने विमानतळावर जप्त केले जाते. परदेशातून सोने आणताना कस्टम विभागाला टिप दिली जाते, परंतु ही टिप फसवण्यासाठी दिली जाते, असे सांगून संबंधित विभागातील अधिकारी म्हणाला की, दहा जण येणार असतील, तर कस्टम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी एखाद्या उतारूची माहिती व्यवस्थित पोहोचवली जाते. कस्टमचे त्याच्याकडे लक्ष गेल्याने अन्य व्यक्ती सुरक्षितपणे निसटून बाहेर पडतात. दाऊदचा अमली पदार्थांचा व्यवसाय कमी झाल्याने तो पुन्हा सोन्याच्या तस्करीत उतरला असल्याचेही या अधिकार्‍याने सांगितले.
केरळमध्ये एका व्यक्तीने ऑक्टोबर या एका महिन्यात 20 किलो सोन्याची तस्करी केल्याचे आढळून आले आहे. त्याची किंमत 26.30 लाख होते आणि भारतात हे सोने 30 लाख रुपयांना विकले जाते. त्यामुळे सोने आणणार्‍या आणि पाठवणार्‍याला एका फेरीत साडेतीन लाखांपेक्षा जास्त फायदा होतो. विमानाचे तिकीट 30 हजार आणि दुबईतील माणसाला एक हजार दिर्‍हाम म्हणजेच 17 हजार रुपये यातून दिले जातात.
किलो सोने जप्त जानेवारी 2014 पर्यंत
2011-12 30 किलो
2012-13 54 किलो
2013-14 204 किलो
सोन्याची गेल्या काही वर्षांतील तस्करी
दिनांक सोने
31 डिसेंबर 03 कोटी
15 जानेवारी 91 लाख
3 फेब्रुवारी 02 कोटी
15 फेब्रुवारी 13 लाख
कशी होते स्मगलिंग?
मोबाइलच्या बॅटरीच्या रूपात, चप्पल-बुटाची पोकळी, बॅगेचे हँडल, इर्मजन्सी लाइट, वॉशिंग मशीन, व्हीलचेअर, लहान मुलांची तीनचाकी सायकल, टीव्ही सेटमध्ये मोठय़ा प्रमाणावर सोने लपवले जाते. यासाठी दुबईतील कारागीर तीन किलो सोने लपवण्यासाठी 500 दिर्‍हाम घेतात.