आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांना अाता वस्तू नव्हे थेट अनुदान, वस्तू स्वरूपाच्या लाभाऐवजी रोख रक्कम होणार खात्यावर जमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील विविध घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांतून देण्यात येत असलेल्या वस्तू स्वरूपाच्या लाभाऐवजी रोख रक्कम संबंधित लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्याच्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात अाली. तसेच कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लाभार्थीला विशिष्ट वस्तू अथवा साधनसामग्री द्यायची झाल्यास त्यासाठी निश्चित कार्यपद्धतीही ठरविण्यात आली आहे.

सध्या शिष्यवृत्ती, रोजगार हमी योजनेतून मिळणारे वेतन, पेन्शन योजना, घरगुती गॅसवरील अनुदान इत्यादी रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्यात येते. याबरोबरच शासनातर्फे विविध कल्याणकारी योजनांतील वस्तू स्वरूपातील लाभाचे वाटपदेखील करण्यात येते. त्यात जनावरांचे खाद्य, कृषी अवजारे, कीटकनाशके, बियाणे, ताडपत्री, अंडी उबविण्याची यंत्रे, वीज पंप, पाइपलाइन, पाठ्यपुस्तके आदींचा समावेश आहे. आता थेट हस्तांतरण योजनेची (डीबीटी) व्याप्ती वाढविताना नागरिकांना दिला जाणारा लाभ वस्तूस्वरूपात न देता त्याऐवजी त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याच्या धोरणास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. हे धोरण राज्य शासनाचे सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे व महामंडळांना लागू राहणार आहे. तसेच जर एखादी वस्तू किंवा साधनसामग्री लाभार्थीला द्यायची झाल्यास त्यासाठी निश्चित कार्यपद्धती राबविण्यात येणार आहे. यामुळे शासनाच्या कारभारात पारदर्शकता येणार आहे. तसेच खरेदीत होणारे गैरप्रकार रोखण्यास मदत होऊन लाभार्थींचा फायदा होणार आहे.

निर्णय कशासाठी?

- लाभार्थीच्या खात्यात रक्कम जमा हाेणार असल्यामुळे याेजनेत पारदर्शकता येईल

- लाभार्थी आवश्यक वस्तूची गुणवत्ता तपासून व भाव करून चांगली वस्तू खरेदी करू शकेल.
- लाभार्थी स्थानिक पातळीवरच खरेदी करणार असल्यामुळे स्थानिक उद्योगांना लाभ होईल.

- वस्तूंची खरेदी प्रक्रिया, वस्तूच्या गुणवत्तेबाबत तक्रारी, अनियमिततेच्या तक्रारी दूर हाेतील.
बातम्या आणखी आहेत...