आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींमुळे आघाडी सरकार जागे झाले; गोपीनाथ मुडेंची आघाडीवर टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. परिणामी गेली 14 वर्षे पडून राहिलेल्या आघाडी सरकारची झोप उडाली असून आता रात्र रात्रभर जागून त्यांनी निर्णयाचा सपाटा लावला आहे’, अशी बोचरी टीका भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी शनिवारी केली.

मुंडे व राष्ट्रीय प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मीडिया सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू रावत, लेखक गिरीश दाबके, निवृत्त पोलिस अधिकारी दिलीप झैले, अ‍ॅड.नचिकेत भट, राष्ट्रीय बास्केटबॉलपटू विष्णू कांबळी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी मुंडे म्हणाले, देशात मोदी लाट असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी बिथरली आहे. त्यांनी निर्णयाचा धडाका लावला असला तरी 14 वर्षे त्यांनी केले काय?आघाडी सरकारच्या भूलथापांना लहान मुलेही बळी पडणार नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे काम आणखी 15 दिवस चालणार आहे. राष्ट्रवादीला त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची गरज होती, म्हणून हे पाऊल उचलावे लागले आहे. लवकरच राष्ट्रवादीचे मोठे नेते भाजपमध्ये येतील, असे मुंडे म्हणाले.

काँग्रेस ‘ऑर्डिनन्स’ फॅक्टरी : नकवी
यूपीए सरकार अध्यादेश (ऑर्डिनन्स) काढत सुटले आहेत. यामुळे काँग्रेसची ‘ऑर्डिनन्स’ फॅक्टरी झाली आहे. खरेतर राहुल गांधींच्या इशार्‍यामुळे काँग्रेस सरकार हलत आहे. मात्र जनतेचा ऑर्डिनन्सला विरोध झाला की ते नॉन्सेन्स म्हणतात. यामुळे काँग्रेसचे हसे झाले आहे, अशी कोपरखळी मुख्तार अब्बास नकवी यांनी मारली.