आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानपदासाठी पवारांचे 25 वर्षे गुडघ्याला बाशिंग - गोपीनाथ मुंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधानपदासाठी गेली 25 वर्षे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मात्र त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. म्हणूनच आपली व्यथा ते नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून बाहेर काढत आहेत, अशी खरमरीत टीका भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.

आष्टी तालुक्यातील माजी आमदार भीमराव धोंडे तसेच साहेबराव दरेकर यांनी समर्थकांसह शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँगे्रसला कंटाळून भाजपमध्ये आलेल्या आमदारांचे मुंडे यांनी स्वागत केले. 3 एप्रिलला आष्टीतही हे दोन्ही माजी आमदार तसेच त्यांच्या समर्थकांचा मोठा प्रवेश कार्यक्रम होणार आहे. या प्रवेशावेळी बोलताना मुंडे म्हणाले, पंतप्रधानपदासाठी सज्ज होऊन मोदींना काही महिनेही झालेले नाहीत. मात्र आम्ही तर पवारांना वर्षानुवर्षे पंतप्रधानपदावर नजर लावून बसलेले पाहिले आहेत. लोकसभा त्रिशंकू होऊन इथून तिथून खासदार जमवून पंतप्रधानांच्या खुर्चीवर विराजमान झालो आहोत, अशी स्वप्ने ते दिवसा ढवळ्या पाहत आले आहेत. या वेळी तर त्यांच्या आशा हवेतच विरून गेल्या आहेत. त्यामुळे व्यथित होऊन मोदींवर ते टीका करत आहेत. शाई पुसा आणि दोनदा मतदान करा, असे सांगत शरद पवारांनी बोगस मतदान करण्यास प्रोत्साहित केले आहे.

निवडणूक आयोगाने त्यावर कारवाई करायला
हवी. पवारांच्या या वक्तव्यामुळेच निवडणूक आयोगाने आता पुणे व परिसरात मताची शाई वाळेपर्यंत मतदारांना केंद्राच्या बाहेर न सोडण्याचे आदेश दिले आहेत. पायाखालची वाळू सरकल्याने पवारांनी निराशेच्या भरात हे वक्तव्य केले आहे, असे मुंडे म्हणाले.

राष्ट्रवादीची पळापळ
मुंडे यांनी गेले महिनाभर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँगे्रस अक्षरक्ष: फोडून काढली आहे. राष्ट्रवादीचे उमदेवार सुरेश धस यांना कोणाचाच आधार उरलेला नाही. परिणामी धस यांच्या आष्टी मतदारसंघातच मुंडे यांना 60 हजारांची आघाडी मिळेल, असा विश्वास माजी आमदार धोंडे व दरेकर यांनी व्यक्त केला. मुंडेंना बीडच्या बाहेरच पडू देणार नाही, अशा भीमगर्जना करणार्‍या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनाच आता बीडमध्ये जाऊन मतांचा जोगवा मागण्याची वेळ आली आहे. धसांसारखा चुकीचा उमेदवार दिल्याने मतदार राष्ट्रवादीवर प्रचंड नाराज आहेत, याकडे मुंडे यांनी लक्ष वेधले.

मराठा समाजाला फसवले
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व मराठा समाजाला आरक्षण देणार अशा भूलथापा देऊन काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रसचे आघाडी सरकार तीनवेळा सत्तेत आले. ओबीसींचा आरक्षणाला विरोध असल्याचे सांगत पाने पुसण्यात आली. मुळात या सरकारलाच हे आरक्षण द्यायचे नव्हते. नारायण राणे यांची समिती नियुक्त करण्यात आली. या समितीला मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे, असे स्पष्टपणे सांगितले. पण, आघाडी सरकारने विश्वासघात केला. आता युतीची सत्ता आल्यानंतर प्रथम आरक्षण व स्मारके हे विषय सोडवण्यात येतील, असे मुंडेंनी स्पष्ट केले.

आष्टीत भाजपची ताकद वाढली
आष्टीचे माजी पंचायत सभापती अ‍ॅड.साहेबराव म्हस्के, बापूराज गर्जे, सतीश झगडे, शेख मैनुद्दीन, हरिभाऊ जंजरे, छगनराव तरटे, संचालक भगवानराव एकशिंगे, संचालक कल्याणराव धवळे, संभाजी जगताप, प्राचार्य गुलाबराव मारकंडे, संजय धायगुडे, सरपंच पांडुरंग गावडे, पाटोदा सरपंच ख्वाजाभाई शेख, सरपंच चंद्रशेखर साके, सरपंच अजिनाथ अनपट, नामदेवराव धोंडे या प्रमुख लोकप्रतिनिधींनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे आष्टीत भाजपची ताकद वाढली आहे.