मुंबई - कार अपघातात अकाली निधन झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यासंबंधी महाराष्ट्र भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपचे वरिष्ठ नेते पांडुरंग फुंडकर म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांना पक्षात मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचीही तयारी केली होती.
महाराष्ट्र विधानपरिषदेत
मुंडे यांनी राज्यात आणि देशात केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा ठराव शुक्रवारी मांडण्यात आला यावेळी फुंडकर यांनी हा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, 'केंद्रात मंत्री होईपर्यंत मुंडेंना पक्षात अपमानीत होण्याचे प्रसंग आले होते. त्यांनी भाजप सोडण्याची मानसिक तयारी देखील केली होती. तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. काँग्रेसने त्यांना व त्यांच्या दोन समर्थकांना केंद्रात व राज्यात मंत्रीपद देण्याची ऑफर दिली होती. मात्र, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना भाजप सोडण्यापासून थांबवले होते.'
पांडुरंग फुंडकर यांच्या या गौप्यस्फोटाने नव्या वादाला जन्म दिला आहे. त्यांनी
मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
मुंडे यांच्या कृतज्ञता प्रस्तावर फुंडकर म्हणाले, '1974 पासून मुंडेंची आणि माझी मैत्री होती. भाजप बहुजनांचा पक्ष करण्यासाठी त्यांनी मोठे कष्ठ घेतले. त्यासोबतच अनेकांनी त्यांनी पक्षात मोठे केले. दुसरा आपल्यापेक्षा मोठा झाला तर, त्यांनी कधी द्वेष केला नाही तर आनंदच मानला.' पक्षात अपमानीत झाल्यानंतर ते अस्वस्थ होते. याबद्दलची आठवण सांगताना फुंडकर म्हणाले, 'तुम्ही मला काँग्रेसमध्ये जाऊ दिले नाही. हेच दिवस पाहाण्यासाठी मला थांबवले होते का, असे मुंडे मला ऐकवत.'
भाजपला बहुमत मिळाल्यानंतर केंद्रात मंत्रिपद मिळेल किंवा नाही,याबद्दलही त्यांना शंका होती, हे सांगत असताना फुंडकर यांचा कंठ दाटून आला. त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली होती.