आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन करणार, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देणाऱ्या गोसीखुर्द प्रकल्पाचे काम १९८३ मध्ये सुरू झाले. आज अनेक वर्षे झाली तरी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही. मात्र, या प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानसभेत याबाबत उपस्थित लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिले.

सुधीर पारवे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित करताना पॅकेजची रक्कम वाढवून देणार का आणि प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना मदत मिळावी म्हणून १९९७ ची लग्नाची अट रद्द करणार का, असा प्रश्न उपस्थित केला. दिलीप कांबळे उत्तरात म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील बाधित ५१ गावांपैकी २२ गावे पूर्णपणे स्थलांतरित झाली असून शिल्लक गावांच्या स्थलांतरणाची कार्यवाही सुरू आहे.

८३४८ बाधित कुटुंबांपैकी ६३६४ कुटुंबे ३० ऑक्टोबर २०१६ पर्यंत स्थलांतरित झाली असून उर्वरित कुटुंबांना जून २०१७ पर्यंत स्थलांतरित करण्याचे धोरण आखण्यात आलेले आहे. तसेच मौजे टेकेपार या बाधित गावाचे पुनर्वसन एप्रिल २०१९ आणि मौजा रुयाडचे पुनर्वसन ऑगस्ट २०१९ पर्यंत करण्यात येईल. या राष्ट्रीय प्रकल्पातील बाधितांसाठी वसवण्यात येणाऱ्या गावठाणात दर्जेदार नागरी सुविधा पुरवण्यात येणार असून नागपूर आणि भंडारा मिळून २५७ कोटी ६५ हजार रुपयांच्या खर्चास सरकारने २९ ऑगस्ट २०१६ ला मान्यता दिली आहे. भंडारा जिल्ह्यातील ३४ बाधित गावांपैकी २८ गावांचे पर्यायी गावठाणात पुनर्वसन करण्यात येत असल्याचेही राज्यमंत्र्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...