आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gossip After Visit Of Raj Thackeray And Ashish Shelar

आशिष शेलार- राज ठाकरेंची बंदद्वार चर्चा, मुंबई महापालिकेत नवी समीकरणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर भेट घेतली. शिवसेनेशी फारकत घेतलेल्या या दाेन्ही पक्षांच्या नेत्यांची भेट झाल्याने वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. मुंबई महापालिकेतही शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी भाजपने मनसेशी जवळीक वाढवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा अाहे.

गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे सव्वा तास दाेघांमध्ये चर्चा झाल्याचे कळते. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मनसेच्या आमदाराने भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल आपण आभार मानण्यासाठी आलो होतो, अशी प्रतिक्रिया शेलार यांनी दिली.
बुधवारी मुंबई पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मनसेने सत्ताधारी शिवसेनेला धारेवर धरले हाेते. डेंग्यूचा फैलाव रोखण्यात अपयश आल्याचे सांगत सभात्याग केला हाेता. त्यावेळी भाजपनेही मनसेला साथ दिली हाेती.
असे आहेत भाजपचे डावपेच
1 विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता राज ठाकरेंचे लक्ष महापालिका निवडणुकांवर आहे. पुढच्याच वर्षी कल्याण डोंबिवली पालिकेची निवडणूक होत असून त्यानंतर साधारण वर्ष दीड वर्षातच मुंबई आणि ठाण्यासारख्या शिवसेनेच्या ताब्यातील महापालिकातही निवडणूका हाेत आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव असाच कायम राहिला तर या पालिका निवडणुकीत शिवसेनेची कसोटी लागू शकते. अशा वेळी मनसेच्या मदतीने शिवसेनेकडून
पालिकांतील सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आणि सत्ताधारी भाजपची साथ मिळाल्याने मनसेलाही ऊर्जितावस्था मिळू शकते.
2 मार्च महिन्यात मुंबई पालिकेच्या स्थायी समितीसह इतर महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. या वेळी भाजप आणि मनसे एक झाल्यास शिवसेनेला बहुमताची गणिते मांडणे अवघड होऊ शकते. त्याचबरोबर पालिकेत अर्थसंकल्प मंजुरीसाठीही भाजपचे पाठबळ नसेल तर शिवसेनेची अडचण होऊ शकते. केंद्रात आणि राज्यात शिवसेनेला दाती तृण धरायला लावल्यानंतर आता महापालिकेतही आपल्या पूर्वाश्रमीच्या मित्रपक्षाची अडचण करण्याचे भाजपचे मनसुबे असल्याचे कळते. ही सगळी राजकीय गणिते लक्षात घेता शेलार आणि राज ठाकरे भेटीला महत्त्व आले आहे.
उद्धव ठाकरे आरामासाठी महाबळेश्वरला
मुंबई - निवडणुकांची रणधुमाळी आणि सत्ताप्राप्तीसाठीचे डावपेच या प्रचंड तणावातून बाहेर पडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी सपत्नीक महाबळेश्वर येथे आरामासाठी रवाना झाले आहेत. गुरुवारी दुपारी दीड वाजता फोर ओक्स बंगल्यावर विशेष हेलिकॉप्टरने उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचे आगमन झाले. उद्धव ठाकरे १७ नाेव्हेंबरपासून राज्यव्यापी दाैरा करणार आहेत. त्यापूर्वी दाेन दिवस आराम करून रिचार्ज हाेण्यासाठी त्यांनी थंड हवेचे ठिकाण निवडले आहे. या दोन दिवसात काेणत्याही राजकीय विषयावर चर्चा किंवा गाठीभेटी घेणार नसल्याचे सांगितले जाते. दरम्यान, राज्यव्यापी दाै-यात उद्धव ठाकरे शिवसेना नेते व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत. तसेच मधल्या काळात भाजपबरोबरच्या चर्चांचा तपशीलही ते प्रथमच उघड करणार आहेत.