आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govansh Hatyabandi Stay And A High Court Petition

गोवंश हत्याबंदीला स्थगितीसाठी आणखी एक याचिका हायकोर्टात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्याबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करून गोवंश कत्तलीला आणि मांसाच्या वाहतुकीला परवानगी देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी हायकोर्टात दाखल करण्यात आली.
गोवंश मांस खरेदी विक्रीच्या व्यवसायात असलेल्या अन्सारी मोहम्मद उमर आणि शेख सादीक बाबूलाल यांच्या वतीने दाखल केलेल्या या जनहित याचिकेत गोवंश हत्याबंदी कायद्याला आव्हान देण्यात आले आहे.

गोवंश हत्याबंदीचा निर्णय हा राज्यघटनेच्या कलम १९ चा भंग असून आम्ही फक्त सरकारने लादलेल्या गोवंश हत्याबंदीच्या निर्णयाला आव्हान देत आहेत. मात्र गायीच्या हत्येबंदी संदर्भातील पूर्वीच्या कायद्याला कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्टीकरण याचिकेत करण्यात आले आहे.

गोवंश हत्याबंदीमुळे ग्रामीण तसेच कृषी व्यवस्थेवर विपरित परिणाम होणार असल्याने या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी विनंतीही याचिकेत केली आहे. तसेच गोवंश कत्तली व्यवसायात तसेच गोवंश मांसाच्या खरेदी विक्री आणि वाहतुकीच्या व्यवसायात असलेल्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणीही याचिकेत केली आहे. मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली असता ती न्या. व्ही.एम. कानडे यांच्या खंडपीठासमोर हस्तांतरित करण्याचे आदेश न्या. शहा यांनी दिले. न्या. कानडे यांच्या खंडपीठासमोर याबाबतची एक याचिका अगोदरच असून त्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्या. कानडे यांनी राज्य सरकारच्या गोवंश हत्याबंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास अगोदरच नकार दिला आहे.