आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Casting Disturbance In The Country Raj Thakare

सरकारला देशामध्ये दंगली घडवायच्यात, राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - ‘आजच्या सरकारला या देशात निवडणुकांच्या तोंडावर दंगली घडवायच्या आहेत. यासाठी याकूबच्या फाशीच्या तमाशा बनवला गेला. हे सर्व मतांचे उद्योग आहेत. पण खबरदार, जर या महाराष्ट्रात काही वेडेवाकडे घडवण्याचा प्रयत्न केलात तर राज ठाकरेंशी गाठ आहे. रस्त्यावर बाहेर काढून फोडून काढीन,’ अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी साेमवारी भाजपच्या केंद्र व राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल करत कित्येक महिन्यांचे ‘मौन’ सोडले. उद्धव ठाकरेंशी भेट, महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे राजकारण, याकूबची फाशी, नरेंद्र मोदींचे मौन आणि न्यायालयांची भूमिका अशा विविध विषयांवर त्यांनी परखड मते मांडली.
विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून शांत असलेल्या राज ठाकरेंनी साेमवारी ठाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात राज्यातील राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी उद्धव ठाकरे आणि आपल्या भेटींबद्दलच्या कथित बातम्यांबद्दल खुलासा केला. ‘इंदूरचे भय्यू महाराज यांच्या आमंत्रणावरून आपण तिकडे गेलो होतो, असा तर्क लावत भेटीच्या या बातम्या पुरवल्या गेल्या,’ असे सांगताना भाजपला घाबरवण्यासाठी शिवसेनेनेच या बातम्या पसरवल्याचा अप्रत्यक्ष आराेप राज ठाकरे यांनी केला.

देवेंद्र फडणवीस चांगला माणूस असल्याचे काैतुक करतानाच त्यांच्या सरकारवर मात्र ठाकरेंनी हल्लाबाेल केला. या सरकारच्या येण्याने राज्यात काही फारसा बदल झाला नसल्याचे त्यांनी नमूद केले. ‘शेतकरी आत्महत्या, सिंचन, टोल, दुष्काळ हे जुनेच प्रश्न आजही कायम आहेत,’ हे सांगतानाच ‘या सरकारची इतक्या लवकर भांडाफोड होईल वाटले नव्हते’, असा चिमटा काढत राज यांनी तावडे आणि पंकजा मुंडे या मंत्र्यांनाही लक्ष्य केले. राज्य सरकारच्या एका खात्यात कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी शंभर कोटींची लाच खाल्ल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘मन की बात करणारे मोदी आता शांत का?’ असा सवाल करत राज यांनी मोदी आणि शहा या भाजपच्या सर्वोच्च नेत्यांवरही शरसंधान केले.

राष्ट्रवादीमुळेच जातीयवाद वाढला
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून चाललेल्या राजकारणाचा निषेध करत राज ठाकरे यांनी जितेंद्र अाव्हाड आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली. ‘राष्ट्रवादी नावाचा पक्ष जेव्हापासून जन्माला आला तेव्हापासून राज्यात जातीयवादाचे विष पसरू लागले अाहे,’ असा थेट आराेप करत राज ठाकरे यांनी ‘एमअायएम’चे अाेवेसी बंधूंनाही नाव न घेता लक्ष्य केले.

जे काँग्रेस केले तेच भाजपही करतेय
परप्रांतीयांच्या नावावर बांगलादेशी नागरिकांना राज्यात प्रवेश दिला जात आहे. या सगळ्यांना पोसण्याचे काम भाजप करत अाहे. खोटी आधार कार्डे वाटताना मनसे कार्यकर्त्यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याला पकडल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. पूर्वी जे काँग्रेस करायची, तेच आता हे पार्टी विथ डिफरन्स म्हणणारे भाजपवाले करताहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

मांसाहार झेपत नसेल तर करू नका
मांसाहाराच्या मुद्द्यावरून राज यांनी गुजराती समाजावर शरसंधान केले. ‘मांसाहार आपल्याला नाही झेपत तर गप्प बसा, पण मांसाहार करणाऱ्यांना विरोध करणे ही दहशत मुंबईत खपवून घेतली जाणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.

न्यायालयाच्या भूमिकेवरही टीका
‘न्यायालये एरवी न्यायासाठी सुट्यांची कारणे देतात अाणि याकूब मेमनसाठी पहाटे तीन वाजता न्यायालये उघडतात, हे दुर्दैवी अाहे,’ हे सांगतानाच महेश भट, सलमान, नसिरुद्दीन शहा, राम जेठमलानी यांनीही याकूबच्या फाशीसंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर राज यांनी नाराजी व्यक्त केली. याकूबच्या केसला २२ वर्षे आणि गणपती मंडपांच्या केसेस मात्र एका फटक्यात निकाली काढल्या जातात,’ याकडेही लक्ष वेधले.

मनसेचे सरचिटणीस होणार नेते
मेळाव्यादरम्यान मनसेच्या संघटनात्मक पदांमध्ये काही बदल करण्यात आले. त्यापैकी महत्त्वाचा बदल म्हणजे अध्यक्षाच्या खालोखाल असलेल्या सरचिटणीस या पदाला आता ‘नेते’ संबोधले जाणार आहे. त्यामुळे बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, दीपक पायगुडे, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, संजय चित्रे, जयप्रकाश बाविसकर हे आता संघटनेत नेते म्हणून संबोधले जातील.