आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटगृहे, मॉलमधून शासन मूत्र गोळा करणार, केंद्रीय मंत्री गडकरींपाठाेपाठ खडसेंचाही उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेतात जास्त उत्पादन निघावे म्हणून गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांचा वारेमाप वापर हाेत अाहे. त्याचा शेतीवर विपरीत परिणाम झाला. अनेक जमिनी नापीक झाल्या. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे सेंद्रिय खताचा वापर करण्यावर भर देता यावा, यासाठी सेंद्रिय शेती धोरण आणणार असल्याची माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. या सेंद्रिय शेतीसाठी मानवी व गुरांच्या मूत्राचा प्रभावीपणे वापर करणार असल्याचेही ते म्हणाले.
जमिनीची सकसता वाढावी यासाठी आम्ही विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. पूर्वी शेणखत मोठ्या प्रमाणावर वापरले जात होते. तेव्हा पीकही चांगले यायचे; परंतु नंतर जास्त पिकाची हाव सुटल्याने रासायनिक खतांचा वापर होऊ लागला आणि जमिनीची नासाडी झाली. मात्र, आता आम्ही मूत्र आणि शेणखत शेतीवर भर देणार आहोत. महात्मा फुले कृषी विद्यापीठात मूत्र आणि शेणापासून शेतीचे प्रयोग करण्यात आले, ते प्रचंड यशस्वी झाले. शेतीसाठी मूत्राचा वापर जगभरात केला जातो. मात्र, आपल्याकडे त्याचा म्हणावा तसा वापर होत नाही. त्यामुळे आता आम्ही सेंद्रिय शेती धोरण आणणार आहोत, असे खडसेंनी स्पष्ट केले.

मूत्राचा वापर शेतीसाठी
केवळ गावांमध्येच नव्हे, तर शहरांमध्येही सेंद्रिय शेती धोरणाचा वापर केला जाणार आहे. शहरातील मॉल, चित्रपटगृहे यामध्ये एकाच वेळेस अनेक व्यक्ती मूत्रालयांचा वापर करतात. हे मूत्र वाया जाते, ते साठवून त्याचा वापर शेतीसाठी करण्याचा विचार सुरू असून नक्की काय करता येईल याबाबत अनेकांशी चर्चा सुरू असल्याचेही खडसे म्हणाले.

गडकरींनीही दिला हाेता नागपुरात जाहीर सल्ला
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही झाडांना खताएेवजी मूत्राची मात्रा देण्याचा जाहीर सल्ला नागपुरात बाेलताना दिला हाेता. ‘मी दिल्लीत एक प्रयोग सुरू केला असून घरी ५० लिटरच्या कॅनमध्ये मूत्र गोळा करतो. काही रोपट्यांच्या वाढीसाठी मूत्र, तर काहींसाठी साधे पाणी वापरा. ज्या रोपट्यांना मूत्र दिले जात आहे त्यांची वाढ साध्या पाण्यावर वाढवलेल्या रोपट्यांपेक्षा दीडपट जास्त आहे. आपल्या मूत्रात युरिया नायट्रोजन आहे. ते खताला पर्याय ठरू शकते,’ असे गडकरी म्हणाले हाेते. मात्र, त्यांच्या या वक्तव्याची साेशल मीडियावर थट्टा उडवली जात अाहे.

कसे असेल सेंद्रिय शेती धोरण
गोठ्यामधील गुरांचे मूत्र आणि शेण पडल्याबरोबर पाण्याच्या फवा-याने ते फिल्टर असलेल्या एका पाइपद्वारे थेट शेतात पोहोचवण्याची योजना आहे. यासाठी गोठ्यात सिमेंटचे नाले बांधण्यासाठी सरकारतर्फे ३५ टक्के सबसिडी दिली जाईल. शेतीच्या कच-यापासूनही खत निर्माण करण्याची योजना असून केळीचे खराब झालेले खांब, गहू, सोयाबीन, तुरीचा कोंडा, खराब झालेल्या भाज्या एका मोठ्या हौदासारख्या जागेत जमा करून त्या सडवून रायजेबियम किड्यांच्या माध्यमातून खत तयार करण्याचीही योजना आहे. गांडूळ खताप्रमाणेच हा प्रकार आहे; परंतु हे किडे फार लवकर कच-याची विल्हेवाट लावून खत तयार करतात. ज्या शेतक-यांना गोठ्यात अशी व्यवस्था उभारायची आहे त्यांच्याकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली असल्याचेही खडसे यांनी सांगितले.