मुंबई - राज्यात दलितांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत असून फडणवीस सरकार अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे या प्रकाराची गंभीरपणे दखल घेऊन अत्याचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आखाव्यात, या मागणीसाठी रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची सोमवारी भेट घेतली.
दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. कुचराई करणा-या अधिका-यांविरोधात कारवाई करावी. अत्याचार प्रकरणातील आरोपींविरोधात कारवाई साठी विभागनिहाय जलदगती न्यायालये स्थापन करावीत, अशी मागणी आठवले यांनी केली. नगर जिल्हा दलित अत्याचारप्रवण जिल्हा जाहीर करावा, दलित अत्याचार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलिस आयुक्त नियुक्त करावा. राज्यात एका उच्चाधिकार समितीची नियुक्त करावी. अत्याचार झालेल्या कुटुंबीयांना १० लाख रुपये मदत द्यावी, अादी मागण्या अाठवलेंनी केल्या.अशा प्रकरणातील आरोपींना अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, अशा विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या.
आठवले सध्या भाजप आघाडीसोबत आहेत. तरीही त्यांनी दलित अत्याचाराबांबत सरकारविरोधात राज्यपालांकडे जावे. त्यामुळे आठवले यांच्या राज्यपाला भेटीला वेगळा संदर्भ प्राप्त होत आहे.
आठवलेंच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात उत्तम खोब्रागडे, गौतम सोनावणे, तानसेन ननावरे, पोपट घनवट, श्रीकांत भालेराव, दयाळ बहादूरे, साहेबराव सुरवाडे, रश्मी यादव यांचा समावेश होता.
गरज पडल्यास पाक ताब्यात घ्या
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची गरज आहेच पण गरज पडल्यास पाकिस्तान ताब्यात घ्यायला हवा. संवादाची भाषा पाकला कळत नसेल तर जी भाषा कळते त्याद्वारे व्यवहार केला पाहिजे, असे आठवले यांनी पंजाबातील अतिरेक्यांच्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले.