आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामी रामानंद तीर्थ यांचा सरकारला विसर!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विकासाच्या बाबतीत मराठवाड्यावर होणा-या अन्यायावर चर्चा होते. मात्र, ही अन्यायाची भावना अधिक दृढ व्हावी, असा प्रकार मुंबईत घडला. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुण्यतिथिनिमित्त मंगळवारी विधान भवनात आयोजित कार्यक्रमाला दस्तुरखुद्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनीच गैरहजेरी लावली.
थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवन परिसरात त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार होते. कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधान परिषद उपसभापती वसंत डावखरे, विधान परिषद सदस्य दिवाकर रावते यांनी आवर्जुन उपस्थिती लावली. मात्र ज्यांनी येणे अपेक्षित होते ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर ज्येष्ठ मंत्रिगण कार्यक्रमाला आलेच नाहीत.
इथेही अनुशेष
मराठवाड्याचा अनुशेष सर्वच बाबतीत आहे. दुष्काळग्रस्तांना मदत देण्यासही सरकारने हात आखडता घेतला. प. महाराष्ट्राला मोठ्या हाताने मदत केली. स्वामीजींना आदरांजली वाहण्यासाठी न येऊन जनतेच्या भावनांचा सकारने अनादर तर केलाच. शिवाय इथेही अनुशेष कायम ठेवल्याची भावना रावते यांनी व्यक्त केली.
‘मराठवाडा’ गायब!
स्वामीजींच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांची गैरहजेरी जशी लक्षात येणारी होती तशी मराठवाड्यातील मंत्र्यांची गैरहजेरी प्रत्येकाला खुपणारी होती. हे मंत्री केवळ स्वत:च्या पक्षाच्या स्वार्थासाठी काम करतात, असा आरोप रावते यांनी केला.
राज्य सरकारचा एका अर्थाने बहिष्कारच!
शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी आणि संताप व्यक्त केला. विधानसभा अध्यक्षांनी या कार्यक्रमाचे रीतसर आमंत्रण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच महोदयांना दिले होते. परंतु ही मंडळी उपस्थित राहिलीच नाही, शिवाय 3 संसदीय कार्यमंत्री असताना एकानेही या कार्यक्रमाची दखल घेतली नाही. राज्य सरकारने एक प्रकारे या कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याचेच चित्र दिसून आल्याचे रावते म्हणाले.