आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government In Harry To Reach Infomation Of Various Scheme To Citizens

शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची सरकारला झाली भलतीच घाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - निवडणुकीच्या तोंडावर विविध शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची सरकारला भलतीच घाई झालेली आहे. त्यामुळेच सरकारी जनसंपर्क विभागाचा फौजफाटा नियुक्त असतानाही खासगी पीआर कंपनीमार्फत योजनांचा प्रचार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी निविदाही मागविण्यात आल्या होत्या. मात्र, दुस-या वेळेसही त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती विभागातील सूत्रांनी दिली.


पुढील वर्षी होणा-या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील अनेक नेत्यांनी स्वत:च्या प्रचारासाठी खासगी जनसंपर्क अधिकारी नेमले आहे. हे जनसंपर्क अधिकारी रोजच्या रोज संबंधित नेत्यांच्या प्रेस रिलीज तयार करून पत्रकारांना पाठवत आहेत. दुसरीकडे, शिवसेना- भाजप नेत्यांनी जलसंपदा व आदिवासी विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सरकारविरोधात आरोपांची मालिकाच सुरू केली आहे. त्यामुळे जनतेच्या मनात सरकारविरोधी भावना निर्माण झाली आहे. याची जाणीव सत्ताधारी कॉँग्रेस- राष्‍ट्रवादीलाही झालेली आहे. आणि म्हणूनच आपली प्रतिमा उजळविण्यासाठी सरकारकडून येत्या काही दिवसात जाहिरात अभियान सुरु करण्यात येणार आहे. एमएमआरडीए व सिडकोने आपल्या कामांच्या प्रचारासाठी खासगी पीआर एजन्सीची यापूर्वीच नियुक्ती केलेली आहे. आता राज्य सरकारनेही खासगी कंपनीकडे प्रचाराचे काम सोपविण्याचा निर्णय घेतलेला आहे.


सुरुवातीला प्रतिसाद शून्यच
खासगी पीआर कंपन्यांकडून सर्वप्रथम ऑगस्टमध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. तीन वर्षांमध्ये किमान 10 कोटींचा व्यवसाय, प्रसारमाध्यमांसाठी मुलाखत तयार करणे, सरकारी जाहिराती तयार करून वर्तमानपत्रे व वाहिन्यांपर्यंत पोहचवणे, सोशल मीडियावर सरकारची विकासकामे, कार्यक्रम व धोरण प्रसारित करणे इत्यादी अटी त्यासाठी सरकारने घातल्या होत्या. या अटींची जंत्री मोठी असल्याने एकाही पीआर एजन्सीने निविदा भरली नव्हती. त्यामुळे निविदेची तारीख 8 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली होती.


मुदतवाढी दिल्यानंतरही कंपन्या उदासिनच
गेल्या चार वर्षांत राज्य सरकारच्या विविध खात्यांनी केलेली विकासकामे, केंद्र सरकारच्या लागू केलेल्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम या पीआर कंपनीकडे देण्यात येणार आहे. मंगळवारी मुदतवाढ दिलेल्या निविदा भरण्याचा अखेरचा दिवस होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वेळीही निविदांना अत्यल्प प्रतिसाद मिळालेला आहे.


आज उघडणार निविदा : श्रद्धा बेलसरे
एरवी सरकारच्या प्रत्येक निविदांवर उड्या मारणा-या खासगी कंपन्यांनी ‘पीआर’च्या कामाकडे मात्र दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त आहेत. याबाबत जनसंपर्क विभागातील अधिकारी श्रद्धा बेलसरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, ‘पीआर कंपन्यांकडून मागविलेल्या निविदांसाठी आज शेवटचा दिवस होता. बुधवारी सकाळी निविदा उघडल्या जाणार आहेत. किती निविदा आल्या आणि कोणाला काम दिले जाईल याची माहिती त्याच वेळी कळेल.’