आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ए, डी व्हिटॅमिनयुक्त सरकारी ‘आरे भूषण’ दूध बाजारात, अाधी मुंबईत नंतर राज्यभर हाेणार वितरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लहान मुलांना व्हिटॅमिन ए आणि डीची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. हे दोन्ही व्हिटॅमिन दुधातून दिल्यास त्याचा मुलांच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन आता राज्य सरकारने आपल्या आरे ब्रॅन्ड अंतर्गत आरे भूषण नावाने एक नवीन उत्पादन बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
 
आरे भूषणमध्ये व्हिटॅमिन ए आणि डीचा समावेश करण्यात येणार असून यासाठी टाटा संस्थेसोबत करार करण्यात आला आहे. सध्या मुंबईत हे दूध उपलब्ध केले जाणार आहे.  त्यानंतर संपूर्ण राज्यात आरे भूषण उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती दुग्धविकास विभागातील सूत्रांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.   
 
खासगी कंपन्या दुधाच्या उत्पादनांमधून कोट्यवधी रुपये कमवत असताना राज्य सरकारचा स्वतःचा ब्रॅन्ड आरे मात्र तोट्यात जात आहे. त्यामुळे आरेच्या जागा विकण्याचा विचार काही वर्षांपूर्वी केला जात होता. वरळी आणि आरेमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन असून मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागांवर खासगी बिल्डरांचा डोळा आहे. वरळीच्या जागेसाठी तर अनेक राजकीय नेत्यांनीही फिल्डिंग लावली आहे. मात्र, राज्य सरकारने आता आरेला उभारी देण्याचा निर्णय घेतल्याने या जागांवर डोळा असलेल्यांची निराशा होणार आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
 
मुंबईतील नागरिकांना निर्जंतुक केलेले दूध उपलब्ध करण्याच्या उद्देशाने १९५१ मध्ये आशियातील पहिली दुग्धशाळा आरे दुग्ध वसाहत मुंबई येथे उभारण्यात आली. आरे दूध, दही, लस्सीसह अनेक उत्पादने तयार करून बाजारात विक्रीस आणते. यासाठी राज्य सरकारने आरे स्टॉल्सचे जाळे मुंबईत उभारले. मात्र, खासगी कंपन्यांना फायदा व्हावा म्हणून आरेच्या उत्पादनांवर दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळेच आरे डेअरी तोट्यात जाऊ लागली आणि सहकारी आणि खासगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर बाजार उपलब्ध झाला. एके काळी लाखो लिटर दूध संकलन करणारा आरे सध्या प्रतिदिन फक्त २.४६ लाख लिटर दूध संकलन करत असून फक्त ०.९६ लाख लिटर दुधाची विक्री होत आहे.

तर खासगी आणि सहकारी संस्था ११२ लाख लिटर दूध संकलन करत असून ८८.१२ लाख लिटर दुधाचे वितरण केले जात आहे. १९६० मध्ये राज्यातील प्रति दिन सरासरी दूध संकलन १ लाख लिटर्स इतके होते, ते सन २०१५ - २०१६ मध्ये ११४ लाख लिटर प्रति दिन इतके वाढले आहे.   

व्हिटॅमिन ए आणि डी चे महत्त्व?    
व्हिटॅमिन ए मुळे त्वचा चकचकीत  होऊन आरोग्यदायी होते. “ए’ अँटि-ऑक्सिडंट असल्याने फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी होऊन त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या कमी होऊन त्वचेची कांती उजळण्यास मदत होते. त्वचेच्या पेशी सुधारण्यास मदत होते. तर ‘डी’ मध्ये कॅल्शियम असल्याने ते हाडांसाठी उपयोगी ठरते. हाडे दुखणे, ठिसूळ होणे, घसरून पडल्याने हाड फ्रॅक्चर होणे आदी विकार होतात. त्यातही स्त्रियांना अधिक त्रास होतो. हाडे मजबूत करण्यासाठी दूध आवश्यक आहे. मात्र, दुधातील कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच हाडे मजबूत करण्यासाठी डी व्हिटॅमिन आवश्यक असते.
 
बातम्या आणखी आहेत...