आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Government Plans To Close All Private Sonography Centers In Beed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उशिराचे शहाणपण: बीडमधील सोनोग्राफी सरकारी रुग्णालयातच, खासगी केंद्रांवर चाप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्त्री भ्रूणहत्येविरोधात राज्य सरकारने कडक उपाययोजना आणि जनजागृती करूनही बीडमध्ये अद्याप हे प्रकार थांबले नसल्याने त्याची गंभीर दखल घेत येथील सर्व खासगी सोनोग्राफी सेंटर बंद करण्याचा विचार आरोग्य विभाग करत असून केवळ सरकारी रुग्णालये आणि दवाखान्यामध्ये सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी रविवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
सोनोग्राफी मशीनचा वापर काही आजारांमध्ये तपासणीसाठीही होतो. त्यामुळे ही सुविधा राज्य सरकारच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ सरकारी रुग्णालये आणि दवाखाने यामध्येच ती उपलब्ध करून देण्याची शिफारसही त्या भागातील सर्व लोकप्रतिनिधींनी केली आहे. त्याची गांभीर्याने दखल घेऊन स्त्री भ्रूणहत्या थांबवण्यासाठी बीडमधील खासगी सोनोग्राफी सेंटर बंद करावीत, अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग त्यावर लवकरच निर्णय घेईल, असे शेट्टी म्हणाले.
अनेक ठिकाणी बेकायदा सेकंड हँड सोनोग्राफी मशीन्सचा वापर होत असून त्याची नोंदणीच केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या मालकांना पकडणे किंवा गर्भलिंग चिकित्सा थांबवणे कठीण होऊन बसते. सर्वसाधारण रुग्णालय किंवा दवाखान्यातून जुने सोनोग्राफी मशीन बदलायचे असल्यास ते कमी किमतीला विकत घेतले जाते आणि त्याचा वापर करून गर्भलिंग चिकित्सा होत असल्याचा प्रकार बीडमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे यापुढे सोनोग्राफी मशीन नवीन किंवा जुने विकायचे असल्यास किंवा भंगारमध्ये काढायचे असल्यास त्यावर सरकारी नियंत्रण राहील अशी तजवीज आरोग्य विभाग करणार आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. जुने झालेले सोनोग्राफी मशीन विकायचे असल्यास किंवा टाकून द्यायचे असल्यास त्याचीही नोंदणी आरोग्य विभागाकडे करणे सक्तीचे केले जाणार आहे. त्यामुळे जुन्या मशीनचा गर्भलिंग चिकित्सेसाठीचा गैरवापर थांबेल. तसेच आरोग्य विभागाने सोनोग्राफी मशीन बनवणा-या कंपन्यांची एक बैठक बोलावली असून कोणाला ही मशीन्स विकली जातात याची माहितीही आता आरोग्य खात्याकडे जमा होणार असल्याचे ते म्हणाले. एखादे मशीन विकल्यास त्या कंपनीने 15 दिवसांमध्ये मशीन विकत घेणा-या व्यक्तीची माहिती राज्य सरकारला देणे बंधनकारक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून देशात तसेच राज्यात भ्रूणहत्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा प्रयत्न करूनही या सोनोग्राफी सेंटर्सना आळा घालण्यास सरकार असमर्थ ठरले आहे. त्यामुळे राज्य सरकार आता तरी या प्रश्नावर जागे होते का, असा प्रश्न सामाजिक संघटना आणि सुजाण नागरिक करत आहेत. यासाठी काही प्रमाणात भ्रूणहत्या करणारे जबाबदार असतात, असेही पाहणीत आढळून आले आहे.

राज्य सरकार बदलणार रणनीती
सरकारने एका गोष्टीवर बंदी आणली की दुस-या मार्गाने गर्भलिंग चिकित्सा करून स्त्री भ्रूणहत्या होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारही आपली रणनीती बदलणार असून कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये पळवाटा राहणार नाहीत याची काळजी घेतली जाणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. स्त्री भ्रूणहत्या थांबवण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीची तातडीने बैठक या आठवड्यात बोलावली असून त्यांच्याकडूनही शिफारशी मागवण्यात आल्या आहेत.

सरकारी अधिका-यांवर कारवाई करणार
बीडमध्ये गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनेमध्ये दोषी असणा-या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. काही पोलिस अधिकारी, सरकारी अधिकारी स्त्री भ्रूणहत्या करणा-या डॉक्टरांना सामील असल्याचा आरोप होत असून त्यात तथ्य आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याचे संकेत सुरेश शेट्टी यांनी दिले.
स्त्री भ्रूणहत्या: डॉक्टरसह पाच जण गजाआड
डॉ. मुंडे कुटुंबाच्या मालमत्तेवर टाच; दांपत्याविरुद्ध पकड वॉरंट
मुंडे हॉस्पिटलमधील मेडिकलला पुन्हा दुसरा परवाना !