आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Ready To Approve Shet Tale For Every Demand

मागेल त्याला शेततळे, जलसंधारणमंत्री नितीन राऊत यांचे स्पष्टीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भूगर्भातील पाणीपातळी खोल गेलेल्या 15 तालुक्यांत हाती घेतलेली साखळी बंधा-यांची कामे अखेरच्या टप्प्यात असून जलसंधारणाच्या कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही जलसंधारणमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. दिवाकर रावते आणि पांडुरंग फुंडकर यांनी 97 अन्वये दाखल केलेल्या दुष्काळावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मागच्या वर्षी सिमेंट बंधा-याच्या कामांना सुरुवात झाली. निवडक 15 तालुक्यांमध्ये सुरू असलेली 86 साखळी बंधा-याची कामे प्रगतिपथावर असून त्यावर 143 कोटी खर्च झाल्याची माहिती राऊत यांनी दिली. तसेच मराठवाड्यात जलसंधारणाची 691 कामे प्रगतिपथावर असून 408 नवी कामे लवकरच हाती घेतली जातील, असे त्यांनी सांगितले. सिमेंट बंधा-याच्या योजनेतील मराठवाड्याच्या वाट्याचा निधी पश्चिम महाराष्‍ट्रात वळवून शासनाने बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप शिवसेनेच्या दिवाकर रावते यांनी केला.

सिमेंटचे साखळी बंधारे बांधण्यासाठी निवडलेल्या 15 तालुक्यात विदर्भातील एकही तालुका नसल्याबद्दल पांडुरंग फुंडकर यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच विदर्भाला शासन सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप करत जरा विदर्भाच्या पदरातही थोडं टाका, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.

मराठवाड्यात जन्मलो, हा गुन्हा आहे काय : नवले
मराठवाड्याचं पाणी उत्तर महाराष्‍ट्राने अडवल्याचा मुद्दा मांडून मराठवाड्यात आम्ही जन्माला आलो, हा काय आमचा गुन्हा झाला काय, असा संतप्त सवाल प्रा. सुरेश नवले यांनी केला. राजकीय उदासीनतेमुळेच ग्रामीण भागात राहणारी जनता घोटभर पाण्याला वंचित झाली आहे. परंतु ही बाब कुणाला सांगताच येत नाही याविषयी अमरसिंह पंडित यांनी खंत व्यक्त केली. दुष्काळी चर्चेतून परस्पर नाव कमी केल्याबद्दल शिवसेनेचे रामदास कदम यांनी संताप व्यक्त करत सभात्याग केला.


संगमनेर दुष्काळी आहे?
संमगनेर (जि. अहमदनगर) तालुक्यात पाण्याची टंचाई नसताना सिमेंट बंधा-याच्या योजनेमध्ये या तालुक्याचा समावेश का केला असा सवाल अमरसिंह पंडीत यांनी केला. तसेच 50 पैशापेक्षा कमी आणेवारी असलेल्या राज्यातील सर्व गावांमध्ये सिमेंटचे साखळी बंधारे बांधण्याची मागणीही त्यांनी चर्चेदरम्यान केली.

राज्यात 73 हजार शेततळी
राज्यात आजपर्यंत 73 हजार शेततळी पूर्ण झाली आहेत. मराठवाड्यातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता शेततळ्याची मागणी करणा-या प्रत्येकाला शेततळे मंजूर केले जाईल, अशी स्पष्ट ग्वाही जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी या वेळी दिली.