आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ATS प्रमुख, नागपूर आयुक्तांची उचलबांगडी, 37 वरिष्ठ IPS अधिका-यांच्या बदल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील विशेषत: नागपुरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याबाबत विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असलेल्या गृह विभागाने सोमवारी ३७ वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्या केल्या. मात्र, नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून अपयशी ठरलेल्या के. के. पाठक यांना पुण्याच्या आयुक्तपदाची ‘बक्षिसी’ देण्यात आली, तर एस. पी. यादव यांच्याकडे नागपूरचे आयुक्तपद देण्यात आले.

आदर्श घोटाळ्यात नाव असलेले संजय बर्वे यांची ‘एसीबी’त वर्णी लावण्यात आली, तर ‘एटीएस’चे प्रमुख हिमांशू राय यांच्या जागी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरेंची हत्या, सिंचन घोटाळ्याची रखडलेली चौकशी, नागपूर तुरुंगातून फरार झालेले पाच सराईत गुन्हेगार आदी घटनांमुळे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी जर्मनी दौ-यावर जाण्यापूर्वी फडणवीस यांनी अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश दिले.

बर्वेंची "आदर्श' नियुक्ती
काँग्रेसच नेते अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदावरील गच्छंतीस कारणीभूत ठरलेला आदर्श घोटाळ्यात नाव असलेले संजय बर्वे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त महासंचालकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. मुंबईतील वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण संस्थेसमोरील प्रकाश पेठे मार्गाची रूंदी कमी करण्यास तत्कालिन वाहतूक सह आयुक्त या नात्याने बर्वे यांनी परवानगी दिली. त्या बदल्यात त्यांनी आपले वडील एस. व्ही. बर्वे यांच्या नावाने आदर्शमध्ये सदनिकाही मिळविली. तसेच अशोक चव्हाण यांना त्यांच्या सास-याच्या फ्लॅटसाठी ६७ लाख बर्वे यांनीच मिळवून दिल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.

विश्वास नांगरे यांना विशेष महानिरीक्षकपद
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भ्रष्टाचाराप्रकरणी चौकशी सुरू आहे. तसेच सिंचन घोटाळ्यासारख्या महत्त्वाच्या प्रकरणांची चौकशी ‘एसीबी’कडून सुरू आहे. या विभागाच्या चौकशीला अधिक वेग यावा म्हणून आक्रमक पोलिस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांना पदोन्नती देऊन या विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्यात गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी नवे महासंचालकपद
राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढावे आणि तपास व न्यायालयीन प्रक्रियेत समन्वय साधता यावा यासाठी गृहविभागाने विधी आणि तांत्रिक महासंचालक हे नवे पद निर्माण केले आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त सतीशचंद्र माथूर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

गुन्ह्याचा फॉरेन्सिक अहवाल लवकर यावा यासाठी पाठपुरावा करणे, सरकारी वकिलाने न्यायालयात बाजू भक्कमपणे मांडावी यासाठी सर्वतोपरी मदत करणे , तपास यंत्रणांशी समन्वय ठेवणे आदी जबाबदा-या आता माथूर यांच्यावर असतील. पूर्वी गुन्ह्यांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया हे वेगळे विभाग होते. परंतु फॉरेन्सिक लॅबचा अहवाल येईपर्यंत वेळ जात असे. त्यातच सरकारी वकील न्यायालयात बाजू योग्यरीत्या मांडत नसल्याने गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण कमी झाले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत गंभीरतेने विचार केला आणि गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण वाढवण्यावर भर देण्याचे ठरवले. सरकारी वकिलांवरही यशाचा मापदंड ठेवलेला असल्याने आता त्यांनाही जास्तीत जास्त खटले जिंकावेच लागणार आहेत. गुन्ह्यांचा तपास योग्यरीत्या व्हावा आणि न्यायालयातही सरकारची बाजू व्यवस्थित मांडता यावी यासाठीच नवीन विधी आणि तंत्रज्ञ विभाग तयार करण्यात आला असून त्याची जबाबदारी सतीशचंद्र माथूर यांच्यावर सोपवली आहे. महासंचालक श्रेणीचे हे राज्यातील सहावे पद आहे.