आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना यंदा शासकीय मानवंदना, फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी (६ डिसेंबर) मुंबईतील चैत्यभूमीवर पहिल्यांदाच शासकीय मानवंदना देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी करावयाच्या विविध उपाययोजना आणि पुरवण्यात येणा-या सुविधांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दालनात सोमवारी बैठक बोलावली होती. यावेळी ते म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शासकीय मानवंदना दिली जाईल याशिवाय हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात येईल. तसेच ६ डिसेंबर रोजी महासंचालनालयामार्फत जाहिरात देण्यात यावी अश्या सूचना दिल्या आहेत.

जवखेडे उद्रेकाची भीती
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड गावी झालेल्या दलित हत्याकांडाचा तपास लावण्यास पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील दलित समाजात राज्य सरकारविषयी मोठा असंतोष आहे. त्याचा उद्रेकही ठिकठिकाणी झालेला आहे. या पार्श्वभूमीवरच दलितांना खूष करण्याचे मार्ग फडणवीस सरकार शोधत आहे. त्याचा भाग म्हणून शासकीय मानवंदना देण्यात येत आहे, अशी प्रतिक्रीया भारिप बहुजन पक्षाचे सचिव ज. वि. पवार यांनी दिली.

आठ विशेष रेल्वे
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेमार्फत सहा आणि कोकण रेल्वेमार्फत दोन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री यांनी या वेळी सोलापूरकरिता विशेष गाडी सोडण्याची सूचना रेल्वे अधिका-यांना केली.

सामाजिक न्याय करा
बाबासाहेब मोठे होते. त्यांना शासकीय मानवंदना देता हे ठीक आहे. मात्र एकीकडे सामाजिक न्यायाचे निर्णय पायदळी तुडवायचे आणि दुसरीकडे मानवंदनासारखी कर्मकांड करायची हा फडणवीस सरकारचा दुटप्पीपणा असल्याचे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर म्हणाले.