आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे समुपदेशन, वैद्यकीय उपचारही करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना शोधून त्यांना समुपदेशन आणि वैद्यकीय उपचार करून आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. आशा व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याची योजना सरकारने आखली आहे.
उस्मानाबाद व यवतमाळ या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या १० तालुक्यांची प्रायोगिक तत्त्वावर त्यासाठी निवड करण्यात आली आहे.
शेतकरी आत्महत्या का करतात, या कारणांचा शोध घेण्याबरोबरच त्यांचे समुपदेशन करणे व त्यांना वैद्यकीय व मानसशास्त्रीय सेवा पुरविणे यावर भर दिला जाणार आहे. आशा व आंगणवाडी सेविका यांच्यामार्फत गावस्तरावर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली जाईल. नैराश्यग्रस्त, दुर्धर आजार, अपंगत्व, कर्जबाजारी, नापिकी आणि व्यसनाधीन असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती अधिक आढळून येते. अशा शेतकऱ्यांना शोधून त्यांची माहिती आशा व आंगणवाडी सेविका वैद्यकीय अधिकाऱ्यांना देणार असून त्यानंतर या वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत समुपदेशन व वैद्यकीय उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सांवत यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत दिली. आशा व आंगणवाडी सेविकांनी समस्याग्रसत शेतकऱ्यांना शोधण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी आशा व अंगणवाडी सेविकांना अधिकचा भत्ता दिला जाणार असल्याचेही अाराेग्यमंत्र्यांनी नमूद केले अाहे.