आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Government Very Egar To Work Its In Incomplete Floor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्रालयाचे काम पूर्ण झाल्याचे दाखवण्‍यासाठी सरकारला घाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगीत खाक झाल्यानंतर मंत्रालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले, मात्र संथ गतीमुळे अपेक्षित वेळेत हे काम पूर्ण होऊ शकले नाही. जळालेले मजले अजूनही तयार झालेले नाहीत. असे असले तरीही काम केल्याचे दाखवण्यासाठीच घाईघाईत सहावा मजला सुरु करून मुख्य सचिवांनी तेथे बसण्यास सुरुवातही केल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे, काम पूर्ण झाल्यानंतर देशातील सर्वोत्कृष्ट मंत्रालय असेल अशी अपेक्षा यूनिटी कंस्ट्रक्शनच्या अधिका-याने ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली.


गेल्या महिन्यात काम दाखवण्यासाठी पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा सहावा मजल्याचे काम संपुष्टात आले असून फक्त केबिनचे काम बाकी असल्याचे सांगण्यात आले होते. या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांचे कार्यालय आहे. गेल्या आठवड्यात मुख्य सचिवांनी आपल्या कार्यालयातून कामकाज सुरु केले. सोमवारी पुन्हा या मजल्याची पाहणी केली असता अजूनही बरेच काम बाकी असल्याचे दिसले. एसी डक्टिंग, इलेक्ट्रिक वायरिंगचे काम सुरु होते. सगळीकडे वायरी लटकत आहेत. कर्मचा-यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येत असून ठोकाठोकीचा आवाजही प्रचंड आहे. एका कोप-यात मुख्य सचिवांचे आलिशान दालन तयार करण्यात आलेले आहे. मात्र त्यांच्या कार्यालयात जाताच केमिकलचा उग्र दर्प येत होता.


‘कॉर्पोरेट लूक’चा दावा
युनिटी कंस्ट्रक्शनच्या अधिका-याने सांगितले की, फर्निचर नवीन असल्याने केमिकलचा वास येत आहे, दोन-तीन दिवसात तो जाईल. काम युद्धपातळीवर सुरू असून या महिन्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दालने तयार होतील आणि ते येथून काम सुरू करू शकतील. मंत्रालय अत्यंत आधुनिक करण्यात येत असून मंत्रालयाला कार्पोरेट लूक देण्यात येत आहे. संपूर्ण काम झाल्यानंतर मंत्रालय हे देशातील सर्वोत्कृष्ट सरकारी कार्यालय म्हणून ओळखले जाईल.


कर्मचारी मास्क लावून
एका कर्मचा-याने सांगितले की, खरे तर इतक्या लवकर आम्हाला येथे शिफ्ट करण्याची गरज नव्हती. अजून खूप काम बाकी आहे. आम्हाला नाकाला मास्क लावूनच बसावे लागत आहे. वासाने डोकेदुखी सुरू झाली आहे. मुख्य सचिवांनी आग्रह केल्याने आणि राज्य सरकारलाही सहाव्या मजल्यावर काम सुरु केल्याचे जनतेला सांगता यावे म्हणूनच घाईघाईने मुख्य सचिवांनी येथून कामकाज सुरू केले आहे.