आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या आहेत. राज्य सरकार दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेच. त्यांच्या मदतीला आता राज्यातील सरकारी डॉक्टर्सही धावून आले आहेत. फेब्रुवारी महिन्यातील एक दिवसाचा पगार दुष्काळग्रस्त निधी म्हणून आपण देणार असल्याचे पत्र डॉक्टरांच्या संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.
राज्यात यंदा प्रचंड दुष्काळ पडला आहे. पाण्याची भीषण टंचाई उद्भवली आहे. राज्य सरकार टँकरद्वारे पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु पाणीच नसल्याने सरकारवरही मर्यादा आहेत. सरकारच्या या प्रयत्नांना आपणही हातभार लावावा, या उद्देशाने डॉक्टरही सरसावले आहेत.
संघटनेची सामाजिक बांधिलकी
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेतर्फे 22 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष राजेश गायकवाड आणि सरचिटणीस प्रमोद रक्षमवार व महिला सचिव डॉ. उज्ज्वला पाटील यांची त्यावर सही आहे.
पत्रात म्हटले आहे की, राज्यातील 12 हजार वैद्यकीय अधिकारी वरिष्ठ अधिका-यांची ही संघटना गेल्या दोन वर्षांपासून राज्यात विविध जिल्ह्यांत रक्तदान, मरणोत्तर नेत्रदान असे संकल्प राबवत आहे. या वर्षी भयंकर दुष्काळ पडला असून ग्रामीण भागात पाण्याचे मोठे संकट उद्भवले आहे. या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही एक दिवसाचे वेतन देणार आहोत. त्यानुसार फेब्रुवारीतील आमच्या पगारातून एक दिवसाचे वेतन दुष्काळ निधी म्हणून कापून घेण्यात यावा.
पायंडा कौतुकास्पद
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील इतर संस्थांतील सर्वच स्थायी, अस्थायी, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यामध्ये शालेय आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मानसेवी वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिका-यांचा या संघटनेत समावेश आहे. त्यांच्या एक दिवसाच्या वेतनामुळे सरकारच्या तिजोरीत सुमारे अडीच कोटी रुपये जमा होणार आहेत. ‘ही रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी फार मोठी नसली तरी परंतु डॉक्टर्सच्या संघटनेने जो पायंडा पाडला तो नक्कीच कौतुकास्पद आहे,’ असे उपमुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.