आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - राज्य सरकारी रुग्णालयांत कोणत्याही आजारावर उपचार घेणा-या रुग्णांना सर्व प्रकारची औषधे मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. सध्या केवळ ठरावीक औषधे रुग्णांना मोफत देण्यात येतात, तर उर्वरित औषधे रुग्णांना खासगी केमिस्टकडून घ्यावी लागतात. मोफत औषधांची सुविधा उपचार घेणा-या सर्वांना उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी आर्थिक उत्पन्नाचा भेदभाव केला जाणार नाही, अशी माहिती आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिका-याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
राज्यामध्ये सुमारे अडीच हजार सरकारी रुग्णालये, दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. येथे रुग्णांना ठराविक औषधेच मोफत मिळतात. त्याऐवजी आता उपचारांसाठी लागणारी सर्व औषधे त्यांना मोफत देण्यात येतील. राज्य सरकारने जेनरिक औषधांचा वापर वाढवल्यामुळे ही मोफत औषधे रुग्णांना देणे शक्य झाले आहे. जेनरिक औषधे ही ब्रँडेड कंपन्यांच्या औषधांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होतात. केंद्र सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशींनुसार आरोग्य विभागाने विविध आजारांवरच्या औषधांची यादी बनवली आहे. त्यात कॅन्सरवरील औषधांचाही समावेश आहे. साधारण 400 प्रकारची औषधे रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येतील, असे अधिका-याने सांगितले.
सरकारी रुग्णालयांमध्ये येणारे बहुसंख्य रुग्ण अल्प उत्पन्न गटातील असतात. सध्या त्यांना बहुतांश औषधे बाहेरून विकत घ्यावी लागतात.
सरकारी रुग्णालये, दवाखाने येथे उपचार घेणा-या सर्व उत्पन्न गटांतील रुग्णांना ही औषधे मोफत देण्याचेही सरकारने ठरवले आहे.
लवकरच घोषणा !
सरकारी रुग्णालयात उपचार स्वस्त झाले तरी औषधी महाग असतात. त्यामुळे अनेक रुग्ण उपचार मध्येच सोडून देतात आणि त्यामुळे आजार बळावतो. ही अडचण लक्षात घेऊनच उपचारादरम्यानची सर्व औषधे मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी लवकरच त्याची अधिकृत घोषणा करतील. त्यानंतर लगेचच या योजनेची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती संबंधित अधिका-याने दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.