आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताग्रस्त मुख्यमंत्र्यांना राज्यपालांचे ‘मार्गदर्शन’, दीड तास संवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवनात भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सुमारे दीड तासाच्या चर्चेत या दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती देण्यात अालेली नाही. मात्र पंकजा मुंडे यांच्या महिला व बालकल्याण विभागावर अाराेप हाेत असलेली साहित्य खरेदी तपासून पाहण्याच्या सुचना राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतही या दाेघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

अंगणवाडीच्या मुलांसाठी महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या खरेदीत २०६ काेटींचा घाेटाळा झाल्याची तक्रार काॅंग्रेसनच्या वतीने ‘एसीबी’कडे करण्यात अालेली अाहे. फडणवीस सरकारमधील हा पहिलाच घाेटाळा अापण उघडकीस अाणल्याचा काॅंग्रेस नेते दावा करत असून मुंडे यांच्या राजीनाम्याचीही जाेरदार मागणी केली जात अाहे. अाता राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही मुंडेंविराेधात राज्यभर रस्त्यावर उतरले असून यानिमित्ताने फडणवीस सरकारला चांगलेच अडचणीत अाणण्याचे प्रयत्न विराेधकांकडून केले जात अाहेत.

पंकजा मुंडे व मुख्यमंत्र्यांनी या अाराेपाचे खंडन केले असले तरी एेन पावसाळी अधिवेशनाच्या ताेंडावर विराेधकांच्या हाती हे अायतेच काेलित लागल्यामुळे मुख्यमंत्री चिंताग्रस्त अाहेत. फक्त हाच एकमेव मुद्दा विरोधकांच्या अजेंड्यावर नसेल तर पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पदव्यांचा वादही अधिवेशनादरम्यान भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकतो. त्यातच आयपीएल घोटाळ्यातील मुख्य आरोपी ललित मोदींची लंडनमध्ये मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारियांनी घेतलेली भेट, भाजपा आमदार राज पुरोहित यांनी एका स्टिंग ऑपरेशनमध्ये पक्षनेतृत्वावर केलेली टीका या सगळ्या बाबींमुळे भाजपाच्या भ्रष्टाचारविरहित शासन या संकल्पनेला तडा गेला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांना मारियांकडून याप्रकरणी स्पष्टीकरण मागवून व ते स्वीकारून त्यांना एकप्रकारे क्लीनचिटच दिली अाहे. हे प्रकरणही विराेधक अागामी अधिवेशनात उचलून धरणार अाहेत.

मार्ग काढणार कसा?
या सगळ्या घटनांच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली असून स्वपक्षीयांनीच वाढवलेल्या या अडचणीतून मार्ग कसा काढायचा याबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे कळते. केंद्रीय नेतृत्वाबाबतही नुकतीच मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली अाहे. जुलै महिन्यात मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर जात अाहेत. या भेटीदरम्यान ते महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला उपस्थीत राहणार आहेत. तत्पूर्वी झालेल्या या भेटीला महत्त्व प्राप्त झाले अाहे.

मित्रपक्षांचीही समजूत काढण्याचे आव्हान
एकीकडे या सगळ्या प्रकरणांमुळे भाजप अडचणीत आलेला असतानाच मंत्रिमंडळ समावेशापासून दूर राहिलेल्याने नाराज असलेल्या मित्रपक्षांनी विरोधकांना दारूगोळा पुरवल्यास अधिवेशनादरम्यान सरकार अधिक अडचणीत येऊ शकते. आठवलेंच्या रिपाइं, मेटेंच्या शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या मित्रपक्षांनाही मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपने झुलवत ठेवल्यामुळे हे पक्ष फडणवीस सरकारवर नाराज आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हाेणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष दानवेंनी जाहीर केले असले तरी मुख्यमंत्री फडणवीसांना त्यासाठी अद्याप केंद्रीय नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्रिपदाच्या आशेने शांत असलेल्या मित्रपक्षांची समजूत काढण्याचे मोठे आव्हानही भाजपसमोर असणार आहे. याबाबतही मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये चर्चा झाल्याचे कळते.