आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडगेबाबांच्या जन्मगावी राज्यपाल उभारणार पुतळा, तेलुगूत चरित्रही लिहिले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - थोर समाजसुधारक संत गाडगेबाबांचे चरित्र वाचून प्रभावित झालेल्या राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गाडगे महाराजांच्या जन्मगावी अमरावती जिल्ह्यातील ऋणमोचन येथे त्यांचा पुतळा उभारण्याचे ठरवले आहे. नागपूर येथील एका शिल्पकाराला हे काम देण्यात आले असून गाडगेबाबांच्या जन्मदिनी म्हणजेच २३ फेब्रुवारी रोजी पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. एवढेच नव्हे तर स्वत: राज्यपालांनी गाडगे महाराजांचे चरित्र तेलुगू भाषेत लिहिले अाहे.

गाडगेबाबांवर इंग्रजी भाषेतील अनेक पुस्तके आणि संदर्भग्रंथ वाचून राज्यपाल सी. विद्यासागर राव प्रचंड प्रभावित झाले.त्यांनी ऋणमोचन येथे जाऊन गावकऱ्यांशी चर्चाही केली. संत गाडगे महाराजांचे चरित्र तेलुगू जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यपालांनी गाडगे महाराजांचे चरित्र तेलुगूत लिहून काढलेय. त्यानंतर त्यांनी गाडगेबाबांचा पुतळा उभारण्याचा संकल्प सोडला. २३ फेब्रुवारी हा संत गाडगेबाबांचा जन्मदिन असून याच दिवशी ऋणमोचन गावी पुतळ्याचे अनावरण करण्याची योजना राज्यपालांनी आखलेली आहे. या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. गाडगेबाबा फक्त महाराष्ट्राचे नसून संपूर्ण देशभरात त्यांचे चरित्र गेले पाहिजे, असा प्रयत्न राज्यपाल करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

संत गाडगेबाबांनी राज्यातील जनतेला स्वच्छतेचे धडे दिले होते. ग्रामस्वच्छता अभियानाचे आद्य प्रणेते असलेल्या महाराजांनी स्वतः हातात झाडू घेऊन गावे झाडून काढली. केवळ साफसफाईच नव्हे तर सफाई म्हणजेच ईश्वराची सेवा असे ते म्हणत असत. त्यांच्यामुळेच अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली गेली आणि जनतेलाही स्वच्छतेही आवड निर्माण झाली. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बनवणाऱ्या कारागिराला त्यांनी गाडगेबाबांचा पुतळा बनवण्यास सांगितले होते. त्याने पुतळा तयारही केला. परंतु तो राज्यपालांना न आवडल्याने आता नागपूर येथील एका शिल्पकाराकडे पुतळा बनवण्याचे काम देण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...