आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायत राज संस्थांना अधिक सक्षम करा, राज्यपालांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘पंचायत राज संस्थांना अधिक सक्षम करण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. आता ७३ व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थांना जादा अधिकार प्रदान करून त्यांना अधिक स्वयंपूर्ण आणि सक्षम करावे,’ असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी रविवारी केले.
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था आणि गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते गाैरव करण्यात आला. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अध्यक्षस्थानी हाेत्या. या कार्यक्रमास ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित आदी उपस्थित हाेते.
‘केंद्र शासनाने कृषी आणि ग्रामविकासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यंदाच्या केंद्रीय व राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी व ग्रामविकासाला चालना देण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्य सुजलाम आणि सुफलाम करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे,’ असे आवाहन राज्यपालांनी केले.

लोकसभेइतकीच ग्रामसभा महत्त्वाची : मुंडे
पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘लोकसभा आणि विधानसभेइतकीच ग्रामसभाही महत्त्वाची आहे. चाैदाव्या वित्त आयोगातून गावांच्या विकासासाठी १५ हजार कोटी रुपये उपलब्ध हाेणार आहेत. त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी ग्रामसभा शक्तिशाली असणे गरजेचे आहे. आतापर्यंत विकासाच्या अनेक योजना गावांत राबवण्यात आल्या आहेत, पण तरीही गावांचा म्हणावा तितका विकास झालेला नाही. हे बदलण्यासाठी नियोजनबद्ध विकास करणे गरजेचे आहे.

यासाठी गावांनी पुढील पाच वर्षांचे विकास आराखडे तयार करावेत व ‘आमचं गाव, आमचा विकास’ हा कार्यक्रम हाती घेऊन सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासाचा कार्यक्रम राबवायला हवा. सांसद आदर्श ग्राम योजना आणि आमदार आदर्श ग्राम योजना यशस्वी होण्यासाठी लोकप्रतिनिधींबरोबर अधिकाऱ्यांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. लोकप्रतिनिधींनी या योजनेतून सादर केलेल्या कामांना तत्काळ गती द्यावी,’ असे आवाहनही त्यांनी केले.

काेल्हापूर, नगर, लातूरला पुरस्कार
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोल्हापूर, लातूर व अहमदनगर या जिल्हा परिषदांना अनुक्रमे पहिले तीन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर), कराड (जि. सातारा) या पंचायत समित्यांना अनुक्रमे पहिले दोन, तर राहुरी (जि. अहमदनगर) व मालवण (जि. सिंधुदुर्ग) या पंचायत समित्यांना तिसरा पुरस्कार विभागून प्रदान करण्यात आला. संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना एकूण २ काेटी ७० लाख रुपयांचे पुरस्कार देण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...