आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदुरकर, आनंदराव पाटील, रूपनवर, खलिफे यांना काँग्रेसकडून आमदारकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी काँग्रेसने आपल्या वाट्यातील सहापैकी चार उमेदवारांची निवड केली आहे. यात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर, सातारा जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, जळगाव जिल्हा प्रभारी अॅड. रामहरी रूपनवर, हुस्नबानो खलिफे यांना आमदारकी देण्यात आली आहे. याचबरोबर प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत व विदर्भातील कार्यकर्ते गणेश पाटील या दोघांची संभाव्य नावे आहेत. मात्र, त्यांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत.
काँग्रेसने ही नावे जाहीर करताना समाजातील सर्व घटकांना स्थान देण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. चांदूरकर हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेले चांदूरकर दलित समाजातून येतात त्यामुळे त्यांच्या नावाला पसंती देण्यात आली. हुस्नबानो खलिफे यांना संधी देताना मुस्लिम समाजात योग्य तो संदेश दिला आहे. याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे निकटचे व सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव पाटील यांनाही संधी दिली गेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे नेते अॅड. रामहरी रूपनवर यांना आमदारकी देऊन या समाजाला जोडण्याचा काँग्रेसने प्रयत्न केलेला आहे. धनगर समाज कायमच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिला. मात्र, बहुजन चेहरा असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे संपूर्ण धनगर समाज भाजपासोबत गेला होता. आता मुंडे यांचे निधन झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने या समाजाला पुन्हा आपल्यासोबत जोडण्यासाठी रूपनवर यांना संधी दिली आहे.
काँग्रेसला अजून दोन उमेदवार निश्चित करायचे आहेत त्यात सचिन सावंत व गणेश पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, पक्षातील काही नेत्यांनी इतर नावे लावून धरल्याने मुख्यमंत्र्यांनी दोन नावे जाहीर करणे टाळले आहे. मात्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची वर्णी जवळपास नक्की मानली जात आहे. सावंत हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत तसेच प्रवक्ता म्हणून काँग्रेसची ते भक्कम बाजू मांडत आहेत. याचबरोबर प्रदेश काँग्रेसच्या सोशल मिडियाचे ते प्रमुख आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच लोकसभेसाठी काँग्रेसने सोशल मिडियावर प्रचार केला होता. त्यामुळे सावंत यांचे नाव निश्चित मानले जात आहे. गणेश पाटील यांचेही नाव आघाडीवर आहे मात्र इतर नेत्यांनी आणखी काही नावे घुसडवल्याने ही नावे जाहीर करण्यास उशीर होत आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादीनेही आपल्या कोट्यातील 6 उमेदवारांची नावे निश्चित करून राज्यपालांकडे पाठविण्यात आली आहेत. त्यात शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले व मावळमधून लोकसभा निवडणूक लढवलेले राहुल नार्वेकर, विद्या चव्हाण, प्रकाश गजभिये, ख्वाजा बेग, अप्पासाहेब शिंदे, रामराव मरकुटे अशी सहा जणांची नावे आहेत. राष्ट्रवादीनेही मुस्लिम, दलित, धनगर व मराठा समाजातील व्यक्तीला स्थान दिले आहे. रामराव मरकुटे हिंगोलीतील धनगर समाजाचे नेते आहेत.