आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भ, मराठवाड्याचा आरोग्य अनुशेष दूर करा, राज्यपालांनी ओढले ताशेरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाने अनुशेष निर्मूलनासाठी नियत वाटप केलेल्या निधीपैकी पुरेसा खर्च केलेला नाही. गेल्या वर्षी आरोग्य विभागाला १६७.८० कोटी रुपयांची तरतूद असतानाही डिसेंबर २०१५ पर्यंत त्यापैकी फक्त ३४.३२ कोटी रुपयेच खर्च करण्यात आले. त्याबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चिंता व्यक्त केली असून पुढील वर्षीसाठी विदर्भ, मराठवाड्यात २९.८८ कोटी रुपये खर्च करावेत, असे निर्देशही दिले अाहेत.

वार्षिक योजना सन २०१६-१७ साठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र मंडळांना राज्यपालांनी निर्देश दिलेले आहेत. वित्तीय अनुशेष असलेले सार्वजनिक आरोग्य हे एकमेव क्षेत्र असल्याची चिंता व्यक्त करीत राज्यपालांनी आरोग्य विभागाने तरतुदी निश्चितपणे खर्च होतील यासाठी सविस्तर कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. तसेच हा सविस्तर कार्यक्रम दोन महिन्यांत राज्यपालांकडे सादर करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्य विभागासाठी १५५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यापैकी ९७० कोटी रु. राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी ठेवण्यात आलेले आहेत. उर्वरित रकमेपैकी २३३ कोटी ८० लाख रुपयांची शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्यसेवांच्या बांधकामासाठी तरतूद करण्यात अालेली आहे. सन २०१६-१७ साठी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे, रुग्णवाहिका, उपकरणे व इतर साधनसामग्री आणि फर्निचरसाठी १०१.४५ कोटी रुपये ठेवण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. या रकमेपैकी विदर्भात १४ कोटी १४ लाख रुपये तर मराठवाड्यात १५ कोटी ७४ लाख रुपये खर्च केले जावेत, असे निर्देशही त्यांनी दिलेले आहेत. गतवर्षी २५ टक्केही निधी खर्च न करणारे अाराेग्य खाते यंदा तरी राज्यपालांच्या या निर्देशांचे पालन करेल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.

मात्र, राज्यपालांच्या अादेशाचे पालन करून हा सर्व निधी याेग्य ठिकाणी खर्च झाल्यास विदर्भ, मराठवाड्यातील आरोग्यसेवेचा दर्जा नक्कीच वाढेल, असे आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

मराठवाडा अनुशेष ५६%
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्च २०१५ रोजी राज्याचा एकूण अनुशेष ३७८ कोटी ७९ लाखांचा अाहे. विभागनिहाय विचार केल्यास मराठवाड्याचा एकूण अनुशेष २१५ कोटी ७७ लाख रु. म्हणजेच ५६.९६ % होता, तर विदर्भाचा अनुशेष शून्य टक्के तर उर्वरित महाराष्ट्रासाठी १६३ कोटी २ लाख रुपये होता.याचा अर्थ मराठवाड्यात आरोग्य सुविधांकडे विभागाचे दुर्लक्ष झाले असा होतो.
बातम्या आणखी आहेत...