आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवार दुपारी 1 पासून धावणार मेट्रो, कुठून कुठेही प्रवास करा फक्त 10 रुपयात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईकरांसाठी एक खूषखबर असून उद्यापासून पहिल्या टप्प्यातील घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावरील मेट्रो धावणार आहे. मात्र, त्याआधीच आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण तापू लागले आहे. दरम्यान, भाजप खासदार किरीट सोमय्या आणि गोपाळ शेट्टी यांना घाटकोपर येथे आंदोलन प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबई मेट्रो वन प्रा. लि. कंपनीचे मुख्य अधिकारी अभय मिश्रा यांनी उद्या दुपारी 1 पासून मेट्रो धावेल असे सांगितले आहे. सध्या तिकीट दर 10 रुपये ठेवण्यात आले आहे. सुरवातीचा एक महिना प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी हे दर आहेत मात्र, नंतर त्यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

तिकीट दरावरून रिलायन्स आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरु असल्याचे पुढे येत आहे. रिलायन्स भरघोस तिकीट दर करावे यासाठी मनमानी करीत आहे. मात्र, निविदेत ठरल्याप्रमाणे दर ठेवले पाहिजेत अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे मेट्रोचे घोंगडे भिजत पडले होते. मुंबईतील भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी शनिवारी दुपारी तीन वाजता स्वतःहून मेट्रोचे उद्घाटन करणार असे काल जाहीर करताच रिलायन्सने रविवारी मेट्रो सुरु करत असल्याचे कळवले आहे. मात्र, यामागे राजकारण असल्याचे सांगत मुख्यमंत्री चव्हाण यांनी भाजप रिलायन्सला मदत करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
निविदेत दिल्याप्रमाणे 9 रूपये, 11 रूपये आणि 13 रूपये असा दर ठेवावा असे सरकारचे म्हणणे आहे तर रिलायन्स हीच वाढ 20, 30 आणि 40 रूपये करावी अशी मागणी करीत आहे. दरम्यान, भाजप उद्घाटनाची घाई करून अंबानींना फायदा पोहचविण्यास मदत करीत आहे. भाजपचे उद्घाटनाच्या श्रेयवादापेक्षा तिकीट दराबाबत भूमिका घ्यावी असा टोला भाजपला हाणला आहे. मुख्यमंत्री चव्हाण यावेळी भलतेच आक्रमक झाले होते. तिकीट दर समितीच्या माध्यमातूनच दरवाढ स्वीकारली जाईल. मनमानी पद्धतीने दरवाढ केल्यास राज्य सरकार कोर्टात धाव घेईल असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र मुख्यमंत्री उद्या मेट्रोच्या उद्घाटनाला जाणार आहेत.
सोमय्यांच्या धमकीनंतर काल दिवसभर मॅरेथॉन बैठकीनंतर कंपनीने यावर तत्काळ पडदा टाकण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर ज्यामुळे मेट्रो रखडली होती त्या तिकीट दराचा मात्र तिढा सोडविण्यात यश आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. मेट्रोचा पहिला टप्पा तयार असून सर्व परवानग्या मिळाल्यानंतर उद्घाटनाचा मुहूर्त निघत नव्हता. याबाबत भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी आवाज उठविला. मेट्रो सुरु करण्यास सरकार टाळाटाळ का करीत आहे असा सवाल करीत सोमय्या यांनी मुंबईकरांचे लक्ष वेधले होते. दरम्यान, आता मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या भूमिकेवर गंभीर आरोप केल्याने भाजप व शिवसेना याबाबत काय भूमिका घेते ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मुंबईतील भाजपचे दुसरे खासदार गोपाळ शेट्टी यांनी रिलायन्सच्या मनमानी दरवाढीला विरोध केला आहे. वाढीव तिकीट दराला आमचाही विरोध आहे. मात्र रिलायन्स व सरकार यांच्या दरावरून वाद सुरु असून मुख्यमंत्री स्वताची कातडी वाचवत आहेत.
दरम्यान, मेट्रो सुरु होणार असल्याच्या घोषणेनंतरही सोमय्या यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसच्या नाकर्ते सरकारमुळेच मेट्रो इतक्या दिवस रखडली. 3 वर्षाचा प्रकल्प 10 वर्षे चालला. आता मेट्रोचे सर्व काम संपल्यानंतर व परवानग्या मिळाल्यानंतरही तिकीट दर ठरत नसल्यामुळ मुंबईकरांसाठी वेठीस धरले जात आहे. त्यामुळेच आपण स्वत शनिवारी दुपारी तीन वाजता मेट्रोचे उदघाटन करणार आहोत. सरकार आणि रिलायन्स कंपनीत तिकीट दर ठरविण्यावरून वाद सुरु आहे. सरकार मागे सरायला तयार नाही व कंपनीही त्यामुळे मेट्रो धावण्यासाठी सज्ज असूनही मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.