आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षण क्षेत्रात 100% एफडीआय! वाणिज्य, उद्योग मंत्रालयाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवीन सरकार सत्तेत येताच पहिला सर्वात मोठा धोरणात्मक निर्णंय लवकरच घेण्याची शक्यता आहे. हा निर्णय आहे संरक्षण क्षेत्रात शंभर टक्के विदेशी थेट गुंतवणुकीचा. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने याबाबतचा मसुदा मंत्रिमंडळांतर्गत सल्ला घेण्यासाठी पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले.
संरक्षण क्षेत्रातील सध्याच्या 26 टक्के विदेशी थेट गुंतवणूक मर्यादेत वाढ करून ती 100 टक्क्यांवर नेण्याच्या प्रस्तावामुळे उत्पादन क्षेत्राला मोठय़ा प्रमाणावर चालना मिळण्यास मदत होणार आहे. गुरुवारी वितरित करण्यात आलेल्या या 15 पानांच्या मंत्रिमंडळ मसुद्यामध्ये विदेशी गुंतवणूकदार संस्थांना केवळ 49 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात येईल. संरक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्याच्या दृष्टीने विदेशी कंपनी स्थानिक कंपनीवर ताबाही मिळवू शकते, असेही यात नमूद केले आहे.

वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यावर निर्मला सीतारामन यांनी हा पहिला महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय असल्याचे स्पष्ट केले. यूपीए सरकारच्या कार्यकाळात संरक्षण क्षेत्रात 26 टक्क्यांपर्यंत थेट विदेशी गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात आली, परंतु अधिक मोठय़ा गुंतवणुकीच्या प्रस्तावाला सुरक्षेवरील मंत्रिमंडळ समितीला मान्यता देण्याची परवानगी देण्यात आली होती.