आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅक्सी घालून फिरल्यास 500 रूपये दंड! नवी मुंबईत महिला मंडळाचा अजब फतवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- नवी मुंबईतील गोठिवली गावातील इंद्रायणी महिला मंडळाने लिहलेला फतवा तेथील चौकातील बोर्डावर लावलण्यात आला आहे)
मुंबई- बलात्काराचे वाढत्या घटनांचा आधार घेत देशाची आर्थिक राजधानी मुंबई परिसरातील एका गावातील महिला मंडळाने महिलांच्या अधिकारावर गदा आणत मॅक्सी (गाउन) न घालण्याचा अजब फतवा काढला आहे. परिसरात फिरताना महिलांनी मॅक्सी घालू नये अन्यथा 500 रूपये दंड वसूल करण्यात येईल असे फर्मान सोडले आहे. दरम्यान, महिला मंडळानेच काढलेल्या फतव्याला महिला संघटनांनी विरोध सुरु केला आहे. एकीकडे महिला वर्गाला सर्वच क्षेत्रात स्वतंत्र अधिकार देण्याच्या वल्गना सुरु असताना आता महिलांनीच महिलांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार नवी मुंबईतील गोठिवली गावात समोर आला आहे.
नवी मुंबईतील गोठिवली गावात इंद्रायणी महिला मंडळ नावाचे महिला मंडळ कार्यरत आहे. ग्रामस्थ मंडळींच्या अधिपत्याखाली असणा-या या मंडळाने महिलांच्याच हक्कावर गदा आणली आहे. या महिला मंडळाने परिसरातून अथवा रस्त्यावरून मॅक्सी घालून फिरल्यास त्या महिलेकडून 500 रूपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सोडले आहेत. तसेच याची अंमलबजावणी होते की नाही यासाठी महिलांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती अशा महिलांना दंड करेल व मॅक्सी घालण्यास प्रतिबंध करेल.
याबाबत इंद्रायणी महिला मंडळाची भूमिका मांडताना मंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मी पाटील यांनी सांगितले की, मॅक्सीसारखे कपडे घातल्यानेच पुरुष महिलांकडे आकर्षित होतात. त्यामुळे बलात्कारासारख्या घटना घडत आहेत. दिल्लीतील निर्भया प्रकरणा असो की मुंबईतील तरूणीवर बलात्काराची घटना असो अशा घटना होऊ नये म्हणूनच आम्ही मॅक्सी घालू नये असा आदेश काढला. आमचे अनुकरन इतरांनीही केले पाहिजे.
दरम्यान, या घटनेची महिला संघटना संस्थांनी दखल घेतली आहे. एखादे महिला मंडळ असे फर्मान काढू शकत नाही. कोणी काय घालावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे सांगत महिलांनी हा आदेश धुडकावून लावावा असे म्हटले आहे. तर, नवी मुंबई पालिकेतील विरोधी पक्षनेते रमाकांत म्हात्रे यांनी महिलांना असे ड्रेसकोड लागू केल्यास त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणल्यासारखेच होईल. सामान्य महिलांवर अशी बंधणे लादू जाऊ शकत नाहीत. आम्ही अशा फतव्यांना कायम विरोधच करू.