आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाळासाहेबांवर आता हिंदीत चित्रपट, नातू राहुल करणार निर्मिती व दिग्दर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल ठाकरे यांच्या बाळासाहेबांवरील आगामी बायोपिकचे नाव \'बाळासाहेब ठाकरे\' असणार आहे. - Divya Marathi
राहुल ठाकरे यांच्या बाळासाहेबांवरील आगामी बायोपिकचे नाव \'बाळासाहेब ठाकरे\' असणार आहे.
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारा बायोपिक बनविण्याचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे. बाळासाहेबांचा नातू राहुल ठाकरे यांनी याबाबतची माहिती देताना दस-याच्या मुहूर्तावर फेसबुकवर टीझर पोस्टर रिलीज केले आहे. विशेष म्हणजे, सोमवारी सायंकाळी या चित्रपटाचा बॅनर माहिमच्या मुख्य नाक्यावर झळकले आहे. राहुल हा बाळासाहेबांचे द्वितीय चिंरजीव जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरेंचा मुलगा आहे. राहुलने कॅनडात जाऊन फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्याने बॉलिवूडमधील काही प्रोजेक्टमध्ये काम केले आहे.
 
राहुल ठाकरे यांच्या बाळासाहेबांवरील आगामी बायोपिकचे नाव 'बालासाहेब ठाकरे' असणार आहे. तसेच या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा ते स्वत:च करणार आहेत. बाळासाहेबांचे विचार, कृती आणि जनसामान्याप्रती असलेली आत्मियता यावर चित्रपटात भर असेल. बाळासाहेबांच्या बायोपिकवरील संवाद व लेखन करण्यासाठी हिंदीतील एक व मराठीतील एक असे दोन प्रख्यात लेखकांनाही या प्रोजेक्टमध्ये सामावून घेतले जाणार आहे. 
 
बाळासाहेब ठाकरेंची भूमिका नेमकी कोण साकारणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. बाळासाहेबांची भूमिका साकारण्यासाठी त्या अभिनेत्याची शरीरयष्टी, बोलण्याची लकब व ठाकरी शैलीतील आवाज याचा ताळमेळ बसणे गरजेचे आहे. मात्र, असा चेहरा अद्याप समोर आलेला नाही. काही अभिनेत्यांच्या नावाचा विचार होत आहे मात्र राहुल यांना अपेक्षित असा अभिनेता मिळत नसल्याचे कळते. मात्र, याबाबतचा लवकरच निर्णय होईल असे कळते.
 
बाळासाहेब ठाकरेंचा जीवनपट हिंदीद्वारे प्रथम समोर येईल. यापूर्वी मराठीत संजय राऊत यांनी 'बाळकडू' हा मराठी चित्रपट बनविला होता. मात्र, त्यात मराठी तरूणाला बाळासाहेबांपासून प्रेरणा कशी मिळते व त्याच्या चेतना जाग्या कशा होतात हे दाखविले आहे. त्यामुळे बाळकडू हा चित्रपट बायोपिक गटात मोडणारा नव्हता. त्यामुळे राहुल ठाकरेंचाच 'बालासाहेब ठाकरे' हा पहिला बायोपिक असेल.
 
'बाळकडू'नंतर उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी बाळासाहेबांवर चित्रपट बनविण्याबाबत मध्यंतरी चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांसोबत चर्चा केली होती. त्यावेळी चित्रपटाच्या पडद्यावर बाळासाहेब म्हणून सर्वसामान्यांना रूचेल असा अभिनेता शोधायचा तर त्याची गुणवैशिष्ट्ये व बारकावे काय असावेत यावर त्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले गेले. मात्र ती बैठक राहुल ठाकरे यांच्या आगामी बायोपिकसाठी होती की, उद्धव व संजय यांच्या मनातही बाळासाहेबांवर चित्रपट बनवण्याचा विचार आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, राहुल ठाकरे यांचे उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. 
 
राहुल ठाकरे हे आपल्या जडणघडणीचे संपूर्ण श्रेय बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आपले काका उद्धव- राज आणि आई स्मिता ठाकरे यांना देतात. त्यामुळे राहुल सर्वांना विचारात घेऊनच बाळासाहेबांवरील बायोपिक बनवेल अशी चर्चा आहे. कारण बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व राजकारण व समाजकारणापुरते मर्यादित ठेवता येणार नाही. त्यामुळेच राहुल यांच्या चित्रपटाबाबत उद्धव ठाकरे यांची काय भूमिका राहते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
 
राहुल ठाकरे हा जयदेव-स्मिताचा थोरला मुलगा आहे. मुंबईत पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने कॅनडात जाऊन फिल्म मेकिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्याचसोबत राहुलने आमिर खानच्या पीके चित्रपटासाठी दिग्दर्शक राजू हिरानीसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर राहुलने आता आपले लाडके आजोबा बाळासाहेबांवर बायोपिक बनविण्याचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट हाती घेतला आहे. राहुल हे सर्व कसे जमवून आणतो याची उत्सुकता आहे. 
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा व पाहा, राहुल ठाकरे यांच्यासंबंधित....
बातम्या आणखी आहेत...